मुंबई : बॉलिवूडचे चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. ‘संजू’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शिका असलेल्या महिलेने हा आरोप केला आहे. हा आरोप हिरानी यांनी फेटाळला असून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे.
मुन्नाभाई एमबीबीएस, 3 इडियट्स आणि पीके सारख्या नावाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. हा आरोप एका मेलद्वारे करण्यात आला असून संबंधित महिलेने हिरानी यांच्याबरोबरच दिग्दर्शक, निर्माते विधू विनोद चोप्रा यांनाही हा मेल पाठवला आहे. ‘संजू’ सिनेमाची सहाय्यक दिग्दर्शक असलेल्या या महिलेने हिरानी यांनी घरी आणि ऑफिसमध्ये लैंगिक शोषण केले असल्याचा आरोप मेलद्वारे केला आहे.
#MeToo : दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप
मात्र हिरानी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीसाठी देखील तयार असल्याचे हिरानी यांनी म्हटलं आहे. याबाबत हिरानी यांनी परीपत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. “दोन महिन्यांपूर्वी मला या आरोपाबद्दल समजलं तेव्हा मला धक्का बसला. मी त्याच वेळी सांगितलं होतं की या प्रकरणाच्या चौकशीसाठी एखादी समिती किंवा कायद्याची मदती घेतली जावी. तरीही तक्रारदार महिलेने ही गोष्ट मीडियासमोर आणण्याचा निर्णय घेतला. पण मला स्पष्ट करायचं आहे की, हा आरोप खोटा, दुर्दैवी असून याचा उद्देश केवळ माझी प्रतिमा मलिन करणे हाच आहे,” असं हिरानी यांनी या पत्रकात म्हटलं आहे.