मुंबई : देशभरात सध्या #MeToo या मोहीमेची जोरदार चर्चा आहे. अनेक निर्माता, दिग्दर्शक, अभिनेत्यांवर महिला कलाकार पत्रकारांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. आता या प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने 'हाऊसफुल्ल 4' चं चित्रीकरण रद्द केलं आहे. कारण या सिनेमाचा दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लागला आहे.


अक्षय कुमारने ट्वीट करत 'हाऊसफुल्ल 4' चं चित्रीकरण रद्द केल्याची माहिती दिली आहे. अक्षय कुमारने लिहिलंय की, "मी आताच भारतात परतलो असून काही बातम्या वाचल्या. तपास पूर्ण होईपर्यंत चित्रीकरण रद्द करण्याची विनंती मी 'हाऊसफुल्ल 4' च्या निर्मात्यांना केली आहे. अशा आरोपांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. जो दोषी सिद्ध होईल, त्याच्यासोबत मी काम करणार नाही. ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत, त्यांच्या व्यथा ऐकून त्यांना न्याय मिळाला हवा."


साजिदवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनी साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. तर साजिदने अनेक महिने माझं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप 'हमशक्ल' सिनेमात साजिदची सहदिग्दर्शक असलेली सलोनी चोप्राने केला आहे. याशिवाय अभिनेत्री रॅचेल व्हाईटनेही साजिदवर आरोप केले होते.

साजिद खानची माघार
तर दुसरीकडे या आरोपांची नैतिक जबाबदारी स्वीकारत साजिदने स्वत:च 'हाऊसफुल्ल 4' च्या दिग्दर्शनातून माघार घेतली आहे. "सत्य समोर येईपर्यंत कोणत्याही निर्णयापर्यंत जाऊ नका," असं आवाहन साजिदने ट्विटरच्या माध्यमातून मीडियाला केलं आहे. तसंच कुटुंब आणि सिनेमाच्या निर्मात्यांवर दबाव येत असल्याने हा निर्णय घेतल्याचं साजिदने सांगितलं.


आमीर खानचा निर्णय
अक्षय कुमारआधी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने गुलशन कुमार यांच्या 'मुगल' या बायॉपिकमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूरवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर आमीरने हा निर्णय घेतला होता. तर या आरोपांनंतर चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी सुभाष कपूरकडून दिग्दर्शनाची जबाबदारी काढून घेतली होती.