जवळपास 10 वर्ष एक दिग्दर्शक चित्रपटाचं स्वप्न बघतो. तो पूर्ण होण्यासाठी झटतो. अनेक अडचणी येतात. पण तो डगमगत नाही. सिनेमाच्या काही भागाचं चित्रिकरण पुन्हा करण्याची वेळ येते पण तो ते नेटानं करतो. त्यानंतर चित्रपट पूर्ण झाल्यावर काही लोकांना तो दाखवला जातो. यातच त्याला आनंद गांधी, आनंद एल रायसारखी माणसं भेटतात. सिनेमा घ्यायचं ठरवतात आणि तीन भाषांमध्ये तुंबाड चित्रपट बनतो. एका दिग्दर्शकाने हट्टाने पाहिलेलं स्वप्न तब्बल दहा वर्षांनी पूर्ण होतं. दहा वर्ष हा थोडाथोडका काळ नव्हे.

खरंतर असा काळ सरत असताना आपल्याला आवडणारी गोष्ट जुनी वाटण्याची किंवा काळापरत्वे जुनी होण्याची शक्यता असते. कारण दहा वर्षात काळ खूप पुढे जातो. आपण काळाच्या मागे असण्याच्या विचाराने एकदा ग्रासलं की त्यातून बाहेर पडणंही तितकंच अवघड. पण राही बर्वेबद्दल असं झालं नाही. कारण कदाचित दहा वर्षांपूर्वी काळाच्या पुढची गोष्ट त्याला सांगायची असावी. नारायण धारपांच्या कथेवर हा सिनेमा बेतला आहे. खरंतर तुंबाड हा शब्द ऐकला की आपल्याला पेंडशांची तुंबाडचे खोत हा कादंबरी आठवते. त्यावरच हा सिनेमा बेतला आहे की काय असं वाटण्याची शक्यताही आहे. पण तुंबाडच्या खोतांशी या कथेचा संबंध नाही.

या दिग्दर्शकाने अत्यंत मनापासून या चित्रतपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची गोष्ट थरारक आहेच. पण ती तशी अंगावर येते ती त्यातल्या ग्राफिक्समुळे. व्हीएफएक्सचा उत्तम वापर ही या चित्रपटाची जमेची बाजू. आज आपण इंग्रजीसह इतर भाषांमध्ये चोख ग्राफिक्स पाहातो. त्यामुळे हा चित्रपट त्याला पुरून उरेल की नाही याबाबत चित्रपट पाहण्याआधी मनात शंका येते. पण या चित्रपटाची टीम पुरेशा तयारीने थिएटरवर उतरली आहे. केवळ ग्राफिक्स नव्हे, तर 1918 पासून 1950 असा काळ उभा करणं हेही तितकंच आव्हानात्मक ठरतं.

या चित्रपटाची पूर्ण गोष्ट काल्पनिक आहे. गोष्ट सुरु होते तो काळ आहे 1918 चा. तुंबाड गावात ही गोष्ट आपल्याला नेते. धरणीमातेची दोन मुलं. त्यापैकी एक हस्तर. हस्तरने लोकांना त्रास द्यायला सुरूवात केली म्हणून हस्तरला मातेन आपल्या पोटात त्याला ठेवलं. हस्तर सतत भुकेजलेला. भुकेसाठी काहीही करू शकणारा हस्तर. सगळे देवजन त्याला भ्यायचे. त्याचा द्वेष करायचे. म्हणून हस्तरचं कुणीही मंदिर बांधलं नाही. अपवाद तुंबाडमधल्या एका वाड्याचा. या वाड्यात हस्तरचं मंदिर आहे.याच वाड्यात हस्तर राहतो असं मानलं जातं. वाड्यात कुठेतरी खजिना लपला आहे, असा ठाम समज लोकांचा आहे. पण तिथे कोणी जात नाही , कारण तिथे हस्तरचं मंदिर आहे. याच खजिन्याच्या शोधाची ही गोष्ट आहे. ही गोष्ट थरारक आहे. काही वळणांवर भीतीदायक आहे. इतकंच नव्हे, तर रंजकही आहे.

पहिल्या फ्रेमपासून या चित्रपटात उभा राहिलेला काळ ही त्याची जमेची बाजू आहे. वेळोवेळी जाणवणारा थरार.. तयार होणारी थंड भीती आणि त्यावेळी पुढे सरकणारी गोष्ट यामुळे चित्रपट पुरता खिळवून ठेवतो. या संपूर्ण चित्रपटावर मराठी संस्कार आहे. त्यामुळे तो आपल्याला जास्त भावतो. कोणताही बौद्धिक डोस न देता हा चित्रपट आपलं रंजन करतो. तो काळ.. त्यातला पाऊस.. तो वाडा आणि त्यातलं छायांकन ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. काळ उभा करण्यासाठी आवश्यक बाबी मानल्या जातात, ती वेशभूषा, कलादिग्दर्शन, अभिनय आणि वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान. या सर्वच पातळ्यांवर चित्रपट उत्तम उतरतो. त्यामुळे तो मनाचा ठाव घेतो.

पटकथेबाबत केवळ एक ब्रेकर येतो तो शेवटाकडे. शेवटी नायकाबाबत जे काही घडतं ते फार लवकर घडतं असं वाटत राहतं. म्हणजे, चित्रपटाच्या सुरूवातीला येणारी म्हातारी.. त्यासाठी घेतलेला वेळ.. तयार केलेली मानसिकता हे सगळं करेक्ट झालं आहे. त्यानंतर एकेक व्यक्तिरेखा आपआपल्या वेगाने पटकथेत येतात ते पटतं. भावतं. पण शेवटाकडे थोडा आणखी वेळ घेतला असता तर ते अधिक परिणामकारक वाटलं असतं. पण चित्रपटाची पकड शेवटपर्यंत राहते.

उत्तम दिग्दर्शन, उच्च तांत्रिक मूल्य, सोहम शाह, ज्योती मालशे, अनिता दाते आदींचा उत्तम अभिनय यांमुळे चित्रपट कमाल वाटतो. एक नवा अनुभव देतो. राही बर्वे हा एक अत्यंत महत्वाचा दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण करेल याची खात्री वाटते. पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला आपण देतो आहोत 4 स्टार.