मुंबई : अभिनेत्री करिष्मा कपूर आणि बिझनेसमन संदीप तोष्णीवाल डेटिंग करत असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये होत्या. इतकंच काय, दोघं जण विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र आता करिष्मा आणि संदीपच्या नात्यात फूट पडल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.


करिष्मा आणि संदीप यांनी आपल्या रिलेशनशीपची जाहीर कबुली कधीच दिली नव्हती. मात्र पार्ट्यांपासून परदेशवारीपर्यंत अनेक ठिकाणी दोघं एकत्र दिसल्याने त्यांच्याबद्दल कुजबूज होत असे.

मे महिन्यात करिष्मा-संदीपने आपल्या नात्याला पूर्णविराम दिल्याचं म्हटलं जातं. करिष्माला पुन्हा लग्नबंधनात अडकण्यात रस नसल्याने त्यांनी नातं तोडल्याची माहिती आहे. करिष्माला समायरा आणि किआन या दोघा मुलांच्या पालनपोषणाकडे लक्ष द्यायचं आहे.

करिष्माला पुन्हा विवाहबंधनात अडकण्यात इंटरेस्ट नसल्याचं करिष्माचे वडील आणि दिग्गज अभिनेते रणधीर कपूर जून महिन्यात म्हणाले होते. 'करिष्माने पुन्हा लग्न करावं, अशी आमची इच्छा आहे, पण तिला पुन्हा संसार सुरु करायचा नाही. तिला मुलांकडे लक्ष द्यायचं आहे' असं रणधीर कपूर म्हणाले होते.

करिष्माने 29 सप्टेंबर 2003 रोजी बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं होतं. ते संजयचं दुसरं लग्न होतं. 11 वर्षांच्या संसारानंतर 2014 मध्ये दोघांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये त्यांना घटस्फोट मिळाला. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा करिष्माकडे आला.

संजय आणि त्याच्या आईने आपला मानसिक छळ केल्याचा आरोप करिष्माने केला होता, तर करिष्माने पैशांसाठी लग्न केल्याचा दावा संजयने केला होता. त्यानंतर, संजय कपूरने प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं. प्रिया सचदेव ही प्रसिद्ध हॉटेल मालक विक्रम चटवालची पत्नी होती.

दुसरीकडे, संदीप तोष्णीवालने 2010 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. संदीप आणि त्याची डॉक्टर पत्नी अश्रिता या दोघांमध्ये सात वर्ष घटस्फोटासाठी लढाई सुरु होती.