काय आहे संध्या मृदुल यांची पोस्ट
करिअरच्या सुरुवातीला मी 'झी'साठी कोडाईकॅनलमध्ये एका टेलिफिल्मचं शूटिंग करत होते. मी मुख्य भूमिकेत होते. आलोकनाथ माझ्या वडिलांच्या, तर रिमा लागू आईच्या भूमिकेत होत्या. आलोकनाथ यांनी माझ्यावर खुश होत सर्वांसमोर माझी तारीफ केली होती. मी 'बाबूजीं'ची चाहती असल्यामुळे माझाही आत्मविश्वास वाढला.
एके दिवशी लवकर पॅकअप झाल्यामुळे आम्ही सर्व कलाकार डिनरसाठी बाहेर गेलो. त्यावेळी त्यांनी प्रचंड प्रमाणात मद्यपान केलं. मी त्यांच्या शेजारीच बसावं, असा आग्रह त्यांनी धरला. 'तू फक्त माझी आहेस' अशी बडबड त्यांनी सुरु केली. मी अत्यंत अवघडले. सुदैवाने माझ्या सहकलाकारांनी वेळीच हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी माझी सुटका केली.
डिनर न घेताच आम्ही रुमवर परतलो. खूप उशिर झाला होता. मी माझ्या खोलीत होते. दुसऱ्या दिवसाचे कॉश्चुम देण्यासाठी क्रू मेंबर माझ्या खोलीत आला होता. तो गेला आणि काही क्षणातच माझ्या दारावर ठकठक झाली. मला वाटलं तोच परत आला. बघते तर मद्यधुंद आलोकनाथ! मी तसाच दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकेना. आलोकनाथ दार ढकलत होते आणि मी ते बंद करण्याचा प्रयत्न करत होते, पण अखेर ते आत शिरलेच. धक्क्याने मी बाथरुमच्या दाराजवळ पडले. ते माझ्यापाशी आले आणि ओरडायला लागले. 'मला तू हवी आहेस... तू फक्त माझी आहेस' मी कशीबशी उठले. त्यांना ढकललं, तर ते धडपडत बाथरुममध्ये गेले. मी त्यांना लॉक करुन रुममधून बाहेर धूम ठोकली आणि पळत लॉबीमध्ये आले.
सुदैवाने आमचा डीओपी तिथे होता. तो माझ्यासोबत रुममध्ये आला. पण आलोकनाथ काही केल्या जायला तयार नव्हते. ते आरडाओरड करत होते, शिव्या देत होते, मला पकडण्याचा प्रयत्नही करत होते. कसेबसे त्यांना हुसकावून लावण्यात आम्ही यशस्वी ठरलो. शेवटी माझ्या हेअरड्रेसरला माझ्यासोबत झोपण्याची विनंती केली.
काही तासात माझे बाऊजींसोबत सीन होते. एका सीनमध्ये तर मला त्यांच्या मांडीवर बसून रडायचं होतं. मला इतकी शिसारी आली, की मी सांगूही शकत नाही. हे प्रकरण इथवर थांबलं नाही. ते रोज संध्याकाळी दारु ढोसायचे आणि रात्र-रात्रभर मला फोन करायचे. त्यांना कसं टाळायचे, हे माझंच मला कळेना. माझ्या हेअरड्रेसरला कायमस्वरुपी माझ्या खोलीत शिफ्ट करावं लागलं.
काही दिवसांनी मी आजारी पडले. ताण असह्य झाला होता. मी शूटही करु शकत नव्हते. ते मला फोन करायचे. दरवाजा ठोठवायचे. एकदा ते आले आणि माझी माफी मागायला लागले. दारुपायी आपला संसार तुटल्याचं त्यांनी सांगितलं. मी तुला मुलीसारखी मानतो, तुझा आदर वाटतो, मला माफ कर असं म्हणाले. मी रडले... ओरडले... पण त्यांच्यावर विश्वास ठेवला. या काळात सहकलाकार, क्रू, डीओपी आणि मुख्य म्हणजे दिवंगत अभिनेत्री रिमा यांनी मला खंबीर पाठिंबा दिला.
मि. अलोकनाथ
मी तुम्हाला माझ्यासाठी माफ केलं. पण तुम्ही विनिता नंदांसोबत जे केलं, त्यासाठी कधीच माफ करु शकत नाही. विनिता मी तुमच्या पाठीशी आहे. तुला बळ मिळू दे.
दोनच दिवसांपूर्वी 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी आलोकनाथ यांनी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. विनिता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून अत्याचाराला वाचा फोडली. #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
विनिता नंदांनंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना रनौत, सोना मोहापात्रा, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.
#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.