मुंबई : अजगर गळ्यात घालून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्याने 'सिंघम' चित्रपटातील गाजलेली अभिनेत्री काजल अग्रवाल टीकेची धनी ठरली आहे. काजलने वन्यजीवांवरील अत्याचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींनी केला आहे.

आगामी तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगसाठी काजल कंबोडियाला गेली होती. त्यावेळी गळ्यात अजगर घातल्याचा एक व्हिडिओ काजलने काढला होता. काही दिवसांपूर्वी तिने तो इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. काजल ही 'पिटा' या वन्यजीवप्रेमी संस्थेची समर्थक असून या व्हिडिओमुळे मात्र ती अडचणीत आली आहे.

हा वन्यजीवांवरील अत्याचार असल्याचा दावा काही सर्पमित्रांनी केला. चित्रपटात मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर केला जातो, हा व्हिडिओ पोस्ट करुन काजल त्यांच्यावरील अत्याचाराला एकप्रकारे प्रोत्साहनच देत आहे, असा आरोप करण्यात आला.

'सापांना लहान पिंजऱ्यात बंदिस्त केल्याने त्यांना खूप त्रास होतो. माणसांच्या मनोरंजनासाठी त्यांचा वस्तूसारखा वापर होतो. काजल अग्रवालने प्राण्यांवरील अत्याचारांना खतपाणी घातलं आहे' असा दावा सर्पमित्रांनी केला.