मुंबई: फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर अशा सोशल मीडिया साईट्सच्या वापरामुळे प्रत्येकजण आपल्या भावना  व्यक्त करत आहे. याबरोबरच सोशल मीडियाच्या वापरामुळे सोशल सेन्सॉरशिपचा किंवा ट्रोलिंगचा काहींना  सामना करावा लागतो असे अनेकदा दिसते.


हिंदीतील 'पदमावत' नंतर आता इतिहासाचा चुकीचा संदर्भ असल्याचा दावा करत, काही नेटीझन्सनी दीपक पाटील दिग्दर्शित 'बारायण ' या मराठी सिनेमाला टार्गेट केलं आहे.

गणुजी शिर्के यांच्याबद्दल चुकीची माहिती  दिली असल्याचा आक्षेप  या लोकांनी नोंदवला असून तो आक्षेपार्ह भाग वगळावा आणि दिग्दर्शकाने माफी मागावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान विश्वास पाटील यांच्या 'संभाजी ' या कादंबरीतील माहितीच्या आधारे तो सिन चित्रपटात घेतल्याची माहिती दिग्दर्शक दीपक पाटील यांनी दिली.

मराठा मोर्चाच्या ट्विटरवरुन विरोध

दरम्यान, बारायणमध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत, मराठा क्रांती मोर्चाच्या ट्विटर हॅण्डलवरुन त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

“शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या “बारायण” चित्रपटात इतिहासाची मोडतोड करुन संगमेश्वर येथे गणोजी शिर्केंनी शंभुराजांना पकडून मुकरबखानाच्या ताब्यात दिल्याचा प्रसंग दाखविण्यात आला आहे. या चित्रपटातून परत एकदा खोटा इतिहास पसरवला जात आहे, हे गंभीर आणि निषेधार्ह आहे”, असं ट्विट मराठा क्रांती मोर्चाच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.

त्यासाठी त्यांनी पुराभिलेख संचालनालयाचं पत्रही ट्विट केलं आहे.