जयपूर : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना पोलिसांनी समन्स बजावला आहे. राजस्थानातील वाल्मिकी समाजाविषयी आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी चुरुच्या पोलिस उपअधीक्षकांनी समन्स बजावला आहे.
22 डिसेंबर 2017 रोजी दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पा आणि सलमानने वाल्मिकी समाजाविषयी आक्षेपार्ह टिपणी केल्याचा आरोप आहे. अशोक पवार नामक युवकाच्या तक्रारीनंतर राजस्थानातील कोतवाली गावात कलम 153 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईत राजगार आहारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून तक्रार नोंदवण्यात आली होती.
शिल्पा, सलमान सोबतच चित्रपट विश्लेषक कोमल नाहटा यांना समन्स बजावण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
सलमान खानने त्याचं नृत्यकौशल्य सांगताना जातिवाचक शब्दाचा वापर केला होता. शिल्पा शेट्टीनेही ती घरी कशी दिसते, हे सांगण्यासाठी याच शब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे.
वाल्मिकी समाजाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी, सलमान-शिल्पावर गुन्हा
सलमान आणि शिल्पाच्या वक्तव्यामुळे वाल्मिकी समाजाकडून भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकारामुळे वाल्मिकी समाज चांगलाच आक्रमक झाला होता. राजस्थानातील सिनेमागृहाबाहेर 'टायगर जिंदा है' चित्रपटाचे पोस्टर्स जाळून घोषणाबाजी करण्यात आली होती.
शिल्पा शेट्टीने मात्र ट्विटवरुन वाल्मिकी समाजाची माफी मागितली होती. 'माझ्या मुलाखतीतील काही शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने मी तसं म्हणाले नव्हते. मात्र तसं झालं असल्यास मी माफी मागते. जाती-धर्माच्या बाबतीत अत्यंत वैविध्य असलेल्या देशाची नागरिक असल्याचा मला अभिमान आहे आणि प्रत्येकाचा मी आदर करते' असं शिल्पा म्हणाली होती.