पुणे : देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना देशाच्या नागरिकांनीच धडा शिकवायला हवा, असं म्हणत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आमीर खानला नाव न घेता खडे बोल सुनावले आहेत. आमीरचं वक्तव्य उद्धट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

 
देशविरोधी बोलण्याची लोकांची हिंमतच होते कशी, असा सवाल पर्रिकरांनी उपस्थित केला. 'एका अभिनेत्याने त्याच्या पत्नीला देश सोडून बाहेर जायचं असल्याचं सांगितलं. हे अत्यंत उर्मट वक्तव्य होतं. जरी माझं घर लहान असेल आणि मी गरीब असेन, तरी माझं माझ्या घरावर प्रेम असतं आणि मी घराचा बंगला करायचं स्वप्न पाहतो.' असं ते म्हणाले.

 
पर्रिकर शनिवार एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पुण्यात बोलत होते. त्या अभिनेत्याला ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीनं जसा धडा शिकवला तसा धडा देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना शिकवायला हवा, असं पर्रिकर म्हणाले. 'त्याच्या वक्तव्यानंतर अनेकांनी तो ब्रँड
अॅम्बेसेडर असलेल्या ऑनलाईन कंपनीला मोठा फटका बसला. अनेकांनी आपली गुंतवणूक काढून घेतली, तर अनेकांनी मोबाईल अॅप अनइन्स्टॉल केलं. त्यानंतर संबंधित ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीने त्याला जाहिरातीतून हटवलं' असं पर्रिकर म्हणाले.