मुंबई : बाहुबलीस्टार प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी 'साहो' चित्रपटाबाबत चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.


शांती, क्योंकि सास भी कभी बहू थी, 24 यासारख्या टीव्ही मालिकांसोबतच 'एक्स्ट्रा इनिंग' या क्रिकेट शोसाठी मंदिराने केलेलं अँकरिंग प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर साहोमध्ये मंदिरा अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. हैदराबादमध्ये सिनेमाचं पहिलं शेड्यूल पार पडलं.



तेलुगू, तमिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हैदराबाद, मुंबई आणि अबूधाबीमध्ये सिनेमाचं शूटिंग होणार आहे. सूजीत रेड्डी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रभास, श्रद्धा कपूर यांच्याशिवाय जॅकी श्रॉफ, चंकी पांडेही या चित्रपटात दिसणार आहेत.

21 वर्षांच्या कारकीर्दीत मंदिरा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मीराबाई नॉट आऊट सारख्या काही चित्रपटांमध्ये ती झळकली. मात्र मोठ्या पडद्यावर तिच्या व्यक्तिरेखा फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत. त्यामुळे साहोमधून ती काय कमाल करते, याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.