मुंबई : अभिनेत्री करिना कपूरच्या इन्कम टॅक्स ई-फायलिंगचं अकाऊण्ट हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. करिना यांच्या सीएच्या तक्रारीनंतर मुंबई सायबर सेल विभागाने एका व्यक्तीला अटक केली आहे.


2016-17 या आर्थिक वर्षातील करिना कपूरच्या इन्कम टॅक्स अकाऊण्टचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न हॅकर करत असल्याची माहिती आहे. दोन महिन्यांपूर्वीच ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

करिना स्वतःच आयकर विवरणपत्र भरत असल्याचं हॅकरने भासवलं होतं. संबंधिताने करिनाचं उत्पन्न कमी असल्याचं दाखवणारं बनावट विवरणपत्र तयार करुन आयकर विभागाला ई-फायलिंग केलं होतं.

सायबर विभागाने गुन्हा नोंदवून तपास केला असता महाराष्ट्राबाहेरुन ही अॅक्टिव्हिटी झाल्याचं समोर आलं. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा केंद्रीय निमलष्कर बलाचा कर्मचारी असून तो इतरांचेही ई-फायलिंग करत असल्याची माहिती आहे.

करिना कपूरने काहीच दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला असून सैफ-करिनाच्या बाळाचं तैमूर अली खान असं नामकरण करण्यात आलं आहे.