Mamukkoya Passes Away: मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मामुकोया (Mamukkoya) यांचे निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने आज (बुधवार) मामुकोया यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानं मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
रिपोर्टनुसार, मामुकोया हे एका फुटबॉलशी संबंधित कार्यक्रमात गेले होते. त्या कार्यक्रमामध्ये ते बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मामुकोया व्हेंटिलेटरवर होते
मामुकोया यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यानंतर आज (बुधवार) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
400 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम
मामुकोया यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. 1979 मध्ये त्यांनी थिएटरमधून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अनेक कॉमिक भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयानं मामुकोया यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
फ्रेंच चित्रपटामध्ये देखील केलं काम
हलाल लव्ह स्टोरी, कुरुथी आणि मिनल मुरली यांसारख्या चित्रपटांमध्ये मामुकोया यांनी काम केलं. या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या कोब्रा या चित्रपटात मामुकोया यांनी महत्वाची भूमिका साकारली,या चित्रपटामध्ये त्यांनी साऊथचा सुपरस्टार विक्रमसोबत काम केले होते. या चित्रपटाचे संगीतकार ए आर रहमान हे होते. याशिवाय त्यांनी फ्लॅमन इम पॅराडी या फ्रेंच चित्रपटात देखील मामुकोया यांनी काम केलं.
अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मामुकोया यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. रमेश बाला यांनी देखील ट्विटरवर ट्वीट शेअर करुन मामुकोया यांना श्रद्धांजली वाहिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :