नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 10 वर्षांनी कॅमेरा समोर आली आहे. ममता कुलकर्णीवर सध्या ड्रग्ज रॅकेटचा आरोप आहे. एबीपी न्यूजच्या प्रतिनिधी शीला रावल यांना दिलेल्या मुलाखतीत ममता कुलकर्णीने अनेक बाबींवर खुलासा केला आहे.


 

 

ममता कुलकर्णीने बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्या बाबतीत अनेक गौप्यस्फोट केले. या मुलाखतीत ममता कुलकर्णीने आपल्यावर असलेल्या ड्रग्जच्या आरोपावरही खुलासा केला.

 

असा झाला ममता कुलकर्णीशी संपर्क

प्रतिनिधी शीला रावल यांनी केनियात असलेल्या ममता कुलकर्णीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फोन बंद होता. मात्र जेव्हा संपर्क झाला, तेव्हा विकी गोस्वामीने ममता कुलकर्णीला कॅमेऱ्यासमोर येण्यास मनाई केली. मात्र अनेक प्रयत्नानंतर ममता कुलकर्णीने एबीपी न्यूजशी संवाद साधला.

 

कोण आहे विकी गोस्वामी?

ममता कुलकर्णी 90 च्या दशकात बॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा म्हणून समोर आली. याच काळात ममता कुलकर्णीच्या आयुष्यात विकी गोस्वामीची एंट्री झाली. विकीचं खरं नाव विजयगिरी गोस्वामी असून तो गुजरात पोलिसचे माजी पोलिस अधिकारी आनंदगिरी गोस्वामी यांचा मुलगा आहे.

 

 

पैसे कमावण्याच्या लालचेने विकीने अवैध मार्गाचा वापर केला. गुजरातमध्ये अगोदर दारुची तस्करी आणि नंतर ड्रग्ज स्मगलिंगच्या व्यवसायात विकीने प्रवेश केला, असा पोलिसांचा दावा आहे.

 

 

विकी गोस्वामीने अहमदाबाद सोडल्यानंतर मुंबईमध्ये आपल्या काळ्या धंद्याची सुरुवात केली. विकी बॉलिवूड प्रेमी होता, शिवाय बॉलिवूडचे अनेक स्टार्स विकीचे मित्र होते. त्यामुळे विकीचा ममताशीही संपर्क वाढला.

 

ममता कुलकर्णीच्या करिअरमधील महत्वाचं वळण

ममता कुलकर्णीचा 1998 साली आलेला चायना गेट सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. जेलमध्ये असलेला विकी गोस्वामी अंडरवर्ल्डच्या संबंधांमुळे चांगलाच चर्चेत होता. ममता कुलकर्णी आणि विकी यांच्या संबंधांमुळे ममताचं करिअर धोक्यात आलं.

 

 

विकीवर लागलेल्या गंभीर आरोपांनतर ममताही संकटात आली. एका वृत्त वाहिनीनुसार ममता कुलकर्णी 2000 साली दुबईमध्ये विकीला जेलमध्ये भेटण्यासाठी गेली. याच भेटीनंतर ममताचं आयुष्य पालटलं, असं बोललं जातं.

 

काय आहेत ममता कुलकर्णीवर आरोप?

मुस्लीम धर्म स्वीकारला तर सजा कमी होईल, या आशेने दुबईच्या जेलमध्ये बंद असलेल्या विकी गोस्वामीने मुस्लीम धर्म स्वीकारला, असं वृत्त इंडियने एक्स्प्रेसने 8 मे 2016 च्या अंकात दिलं होतं.

 

 

कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी विकीने मुस्लीम धर्म स्वीकारला. त्यामुळे ममता कुलकर्णीनेही मुस्लीम धर्म स्वीकारला, असं सांगितलं जातं. विकीने आपलं नामांतर युसूफ अहमद रखा तर ममता कुलकर्णीने आयशा बेगम असं केलं. दोघांनीही जेलमध्येच लग्न केल्याचं सांगितलं जातं.

 

केनियामध्ये विकी गोस्वामीचं आव्हान संपुष्टात

विकी गोस्वामीची ओळख केनियातील सर्वात मोठा ड्रग माफिया आकाशा ब्रदर्सशी झाली. मात्र केनियात आकाशा ब्रदर्स इब्राहीम आणि बख्ताश यांच्यासह विकीला अटक करण्यात आली, असा दावा करण्यात येतो.

 

 

ठाणे पोलिसांनी एप्रिल 2016 मध्ये सोलापूरच्या एका कारखान्यातून तब्बल साडे 18 टन ड्रग जप्त केल्यानंतर ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी पुन्हा चर्चेत आले. या ड्रग्ज प्रकरणाचा सुत्रधार विकी गोस्वामी आहे, असा दावा ठाणे पोलिसांचा आहे.

 

 

ममता कुलकर्णीच्या आयुष्यातील या संपूर्ण बदलावानंतर ती खरंच या ड्रग रॅकेटशी जोडलेली आहे, का हा गंभीर प्रश्न आहे. केनियामध्ये विकी गोस्वामी अजूनही ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचं बोललं जातं.