मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील प्रेमसंबंध आता झाकल्या मुठीप्रमाणे राहिलेले नाहीत. दोघांनीही याबाबत उघडपणे वाच्यता करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मलायकाच्या 16 वर्षांच्या मुलाने आईच्या नव्या नात्याबद्दल दाखवलेला समंजसपणा चर्चेचा विषय ठरला आहे.

43 वर्षांची मलायका आणि 34 वर्षांचा अर्जुन. मलायका घटस्फोटित आणि वयाने मोठी, शिवाय किशोरवयीन मुलाची आई. त्यामुळे वयाने नऊ वर्षांनी लहान, अविवाहित तरुणासोबतचे तिचे प्रेमसंबंध चर्चेचा विषय ठरले नसते, तरच नवल. त्यातच बॉलिवूडमध्ये एका भिंतीला शेकडो कान असतात. एकीकडे नेटिझन्स दोघांना यथेच्छ ट्रोल करत असताना तिच्या कुटुंबातून मात्र तिला चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे.

अर्जुनसोबत नव्या नात्याला सुरुवात करण्याविषयी मलायकाने 16 वर्षांच्या अरहानजवळ विषय काढला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया ऐकून तिच्याही डोळ्यात पाणी आलं. आपला लेक आपल्या नव्या नात्याचा स्वीकार करण्याबाबत किती समजूतदारपणा दाखवत आहे. म्हणजेच आपण मुलावर योग्य संस्कार केले, असे भाव तिच्या मनात तरळले.

अरहानची प्रतिक्रिया काय होती, या प्रश्नावर मलायकाने उत्तर दिलं. 'कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रामाणिक राहायला हवं, असं मला वाटतं. तुमच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे निकटवर्तीयांना सांगणं आवश्यक आहे. या गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा. आमचं याविषयी बोलणं झालं आणि सगळे आधीपेक्षा जास्त आनंदी आहेत' असं मलायका म्हणाली.

'तुम्ही रिलेशनशीपमध्ये असताना वय आड येत नाही. हे दोन हृदयं आणि डोक्यांचं कनेक्शन असतं. दुर्दैवाने आपण अशा समाजात राहतो, जे वेळेसोबत पुढे जाण्यास तयार नाहीत. सगळीकडे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषावर प्रेम करणाऱ्या महिला दिसतात. मात्र एखादी महिला वयाने लहान पुरुषावर प्रेम करते, तेव्हा तिला हताश आणि म्हातारी म्हटलं जातं' असंही मलायका म्हणाली.

अर्जुन कपूरसोबत कधी विवाहबंधनात अडकणार, या प्रश्नाचं उत्तर देण्यास मात्र मलायकाने टाळलं.