मुंबई: 'ए दिल है मुश्किल'वरुन सुरु झालेला वाद क्षमतो, तोच एका भारतीय मॉडेलने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यास अभिमान वाटेल, असे वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे. माजी मिस टीन नॉर्थ-ईस्ट आणि प्रसिद्ध अभिनेत्री माहिका शर्माने, 'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणे, म्हणेज कलेवर बंदी घालण्यासारखे आहे. तेव्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यास मला अभिमानच वाटेल,'' असं वक्तव्य केलं आहे.


जम्मू आणि काश्मिरच्या उरीमध्ये भारतीय सैन्य दलाच्या मुख्यालयावर 18 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत राजकीय पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम देण्यास विरोध दर्शवला होता. या हल्ल्यानंतर भारताच्यावतीने 28 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन उरी हल्ल्याचे उट्टे काढले होते.

यानंतर 'ए दिल है मुश्किल'च्या प्रदर्शनावरुन सुरु असलेल्या वाद क्षमण्यास 24 तासही उलटले नाहीत, तोच भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल माहिका शर्माने वाद उकरुन काढला आहे. महिका म्हणते की, ''वास्तवात आम्हाला त्यांची मदत केली पाहिजे. पाकिस्तानात माझे अनेक मित्र आहेत. जे भारतात काम करण्यासाठी इच्छूक आहेत. दहशतवाद्यांना आपलं सैन्यदल प्रत्युत्तर देत आहे. शहीद जवानांच्या हौतात्म्यावर सर्वच भारतीयांना दु:ख आहे. मात्र, यासाठी आपण पाकिस्तानी कलाकारांना दोषी धरु शकत नाही.''