मुंबई : एकीकडे सीमेवर आपले जवान शहीद होत असताना, पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करु नये, अशी जनभावना आहे. त्यामुळे निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांनी यापुढे घातलेल्या बंदीचं आपण स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन'मध्ये बोलते होते.


'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाच्या वादासंदर्भात सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक केली. त्या बैठकीत नेमकं काय झालं, याबाबत प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, पाक कलाकारांनी भारतात काम करु नये, अशी जनभावना आहे.

"नाणिजमध्ये विचाराअंती गेलो"

नाणिजमधली उपस्थिती ही विचाराअंती लावल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. "56 हजार लोक देहदान करत असताना, त्यांच्या उपक्रमाचं कौतुक करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे आणि त्यामुळेच आपण नाणिजला गेलो होतो.", असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

बाबा बोडके कोण होता, हे माध्यमांमध्येच छापून आल्यानंतर आपल्याला समजल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, मला कुठेही जाताना हेल्मेट घालून जावं लागत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विधानांचाही समाचार घेतला.