Actress Madhuri Dixit Sridevi :   बॉलिवूडमध्ये  एखाद्या कलाकाराला सुपरस्टार, टॉपचा अभिनेता होण्यासाठी एखादा चित्रपट पुरेसा ठरतो. अनेक कलाकारांच्या सिने कारकिर्दीत असे काही चित्रपट त्यांना मिळाले आहेत. काही वेळेस एखाद्या कलाकारांनी नाकारलेला चित्रपट दुसऱ्या कलाकारांनी स्वीकारला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला असल्याची उदाहरणे आहेत. अभिनेत्री श्रीदेवीने (Sridevi) नाकारलेला चित्रपट हा माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) स्वीकारला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली. 


माधुरी दीक्षित ही नव्वदच्या दशकातील बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. पण माधुरी दीक्षितला सुपरस्टार बनवण्यात अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यातील एक कारण म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी. श्रीदेवीने नकार दिलेल्या चित्रपटाला माधुरीने होकार दिला आणि त्यानंतर माधुरीचे नशीबच पालटले. 


सुमारे 32 वर्षांपूर्वी, एक फॅमिली ड्रामा चित्रपट झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करून निर्मात्यांना मालामाल केले होते. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या यशामुळे माधुरी दीक्षितही स्टार झाली. हा चित्रपट म्हणजे 'बेटा'. 


'बेटा' हा फॅमिली-ड्रामा चित्रपट 1992 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अरुणा इराणी, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, भारती आचरेकर, प्रिया बेर्डे आदींच्या भूमिका होत्या. अरुणा इराणी यांची भूमिका खलनायकी होती. त्यामुळे काही अभिनेत्रींनी ही भूमिका स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, अरुणा इराणी यांनी ही भूमिका स्वीकारली. 


'बेटा' चित्रपट हा तामिळ हिट चित्रपट 'इंगा चिन्ना रसा' या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात के. भाग्यराज, राधा आणि सी.आर. सरस्वती यांनी काम केले होते. हिंदीमध्ये होत असलेल्या या रिमेक चित्रपटासाठी पहिली पसंती माधुरी दीक्षित नसून श्रीदेवी होती.


श्रीदेवीने नाकारली होती भूमिका...


सुरुवातीला बोनी कपूर 'बेटा' चित्रपट बनवत होते. त्यांनी सर्वप्रथम श्रीदेवीला मुख्य अभिनेत्रीची भूमिका ऑफर केली होती. परंतु तिने काही कारणास्तव ती नाकारली. यानंतर चित्रपट निर्माते इंद्र कुमार यांनी चित्रपटाचे हक्क घेतले. इंद्र कुमार यांनी 'बेटा'साठी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांना कास्ट केले. या चित्रपटाच्या यशाने माधुरी दीक्षित स्टार बनली. 'बेटा' चित्रपटात अनिल कपूरसोबत माधुरी दीक्षितच्या केमिस्ट्रीने धमाल उडवून दिली. 


'बेटा' ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट


अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा 'बेटा' रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाचे बजेट जवळपास तीन कोटींच्या आसपास होते. या चित्रपटाने त्यावेळी 23.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'बेटा' ने सर्वोत्कृष्ट अभिनेता (अनिल कपूर), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (माधुरी दीक्षित), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (अरुणा इराणी), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (अनुराधा पौडवाल) आणि सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन (सरोज खान) यासह 5 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते.