मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील 'इंदु सरकार' सिनेमावर काँग्रेसकडून आक्षेप घेतला असून, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सिनेमावर तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. या सिनेमाच्या निर्मितीमागे कोणत्या संघटनेचा हात आहे, हे आम्हाला माहित असल्याचा आरोप सोमवारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी केला. शिंदेंच्या आरोपांना सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी 'इंदु सरकार' या सिनेमावर  आक्षेप घेतला होता. ''या सिनेमाच्या निर्मिती मागे जी संघटना आणि व्यक्तीचा हात आहे, त्याबद्दल आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्ही सिनेमा दाखवलेल्या खोट्या दृश्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो,'' असं म्हणलं होतं.

यावर सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकरने आयएएनएसला प्रतिक्रिया दिली. मधुर भांडारकर म्हणाला की, ''ज्योतिरादित्य शिंदेंनी पूर्ण सिनेमा पाहण्याआधीच अशी वक्तव्य केली आहेत, त्याबद्दल मला आश्चर्य वाटतं. एक व्यक्ती म्हणून मी त्यांचा आदर करतो. पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. या सिनेमाचा एकच ट्रेलर सध्या रिलीज झाला आहे. ज्यात कोणत्याही राजकीय नेत्याचा आम्ही उल्लेख केला नाही.''

सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकरने इंदु सरकार या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, यात 1975 मधील आणीबाणीचा काळावर आधारीत आहे. त्यामुळे सिनेमातील व्यक्तीरेखांवर विचारले असता, भंडारकर म्हणाला की, ''इंदु सरकार' हा सिनेमा 70 टक्के काल्पनिक असून, 30 टक्के भाग हा वास्तदर्शी आहे.  सिनेमाची पार्श्वभूमी आणीबाणीच्या काळावर आधारीत असल्याची माहिती सर्वांनाच आहे. तेव्हा सिनेमाची कथा समजण्यासाठी प्रेक्षकांना संपूर्ण सिनेमा पाहावाच लागेल.''

या सिनेमाकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहणे चुकीचं असून, याची कथा आणीबाणीच्या काळातील मीडिया रिपोर्टवर आधारीत असल्याचं मधुर भांडारकरने यावेळी सांगितलं. दरम्यान, या सिनेमाबद्दल सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आनंद व्यक्त केला आहे. 'इंदु सरकार' सिनेमातील ट्रेलरमध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या नावाचा उल्लेख नसल्याने ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

निहलानी यांच्या वक्तव्याबद्दल भांडारकरला विचारलं असता, तो म्हणाला की, 'निहलानींच्या वक्तव्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. या सिनेमासंदर्भातील त्यांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो,'' अशी शक्यताही भांडारकरने यावेळी व्यक्त केली.

मधुर भांडारकरचा इंदु सरकार हा सिनेमा 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

सिनेमाचा ट्रेलर पाहा


संबंधित बातम्या

'इंदु सरकार'साठी NOC ची गरज नाही, सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांचं मत

आणीबाणीवर आधारित 'इंदू सरकार'चा ट्रेलर रिलीज