मुंबई : टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीची बॉक्स ऑफिसवर जोरदार बॅटिंग चालू आहे. ‘धोनी दी अनटोल्ड स्टोरी’ सिनेमाने चार दिवसात तब्बल 74.51 कोटी रुपयांची कमाई केली आहे. समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली.


सिनेमाने शुक्रवारी 21.30 कोटी, शनिवारी 20.60 कोटी, रविवारी 24.10 कोटी तर सोमवारी 8.51 कोटी रुपयांची कमाई केली.


या वीकेंडमध्ये हा सिनेमा 60 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त कमाई सिनेमाने केली.

संबंधित बातमी : धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषच्या मृत्यूची दुर्दैवी कहाणी

पहिल्याच दिवशी 20 कोटी कमाई करणारा हा या वर्षातील दुसरा सिनेमा आहे. या अगोदर ‘सुलतान’ या सिनेमाने 36 कोटींची कमाई केली आहे. धोनीने शाहरुख खानच्या ‘फॅन’लाही मागे टाकलं आहे. ‘फॅन’ने पहिल्या दिवशी 19 कोटींची कमाई केली होती. त्या पाठोपाठ धोनीच्या सिनेमाने 20 कोटींची कमाई करत नवा विक्रम नोंदवला आहे.

दिग्दर्शक नीरज पांडे यांचं दिग्दर्शन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. अनेक शहरात या सिनेमाचे शो हाऊसफुल सुरु आहेत. या सिनेमातून धोनीच्या आयुष्यातील अनेक किस्सेही समोर आले आहेत.

कोणत्याही सुट्ट्या नसताना एवढी कमाई करण्याचा अनोखा विक्रम या सिनेमाच्या नावावर झाला आहे. सिनेमाला चेन्नईमध्ये जबरदस्त ओपनिंग मिळाली. हा सिनेमा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. त्याचा देखील फायदा झाल्याचं दिसत आहे.

देशभरात 30 ऑक्टोबरला जवळपास 3 हजार स्क्रिनवर हा सिनेमा रिलीज झाला आहे.

संबंधित बातम्या

धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषच्या मृत्यूची दुर्दैवी कहाणी