पाक कलाकारांकडे व्हिसा, अवैध घुसखोरी नाही : ओम पुरी
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2016 10:58 PM (IST)
नवी दिल्ली : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ओम पुरी यांना पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलेला आहे. पाक कलाकारांकडे अधिकृत व्हिसा असून त्यांनी भारतात अवैध प्रवेश केलेला नाही, अशी कड ओम पुरी यांनी घेतली आहे. 'पाकिस्तानी कलाकार हे अधिकृत वर्क व्हिसावरच भारतात काम करत आहेत. त्यामुळे अचानक त्यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या भारतीय निर्मात्यांनाच मोठा फटका बसणार आहे. हा निर्णय सरकारी पातळीवर घेतला गेला असता, तर गोष्ट वेगळी' असं ओम पुरी म्हणाले. मनसेच्या इशाऱ्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून काढता पाय घेतला होता. त्यानंतर सलमान खानने पाक कलाकारांची बाजू घेतल्यानंतर त्याच्यावरही राज ठाकरे, नाना पाटेकर यांनी टीकेची झोड उठवली. मात्र ओम पुरी यांनाही पाकिस्तानी अभिनेत्यांचा कैवार घ्यावासा वाटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 'सरकार कारवाई करत असताना आपण शांत बसायला हवं. पाकिस्तानी कलाकारांना इथेच राहू देणं किंवा परत पाठवणं यामुळे फारसा काही फरक पडत नाही. मी सहा वेळा पाकला गेलो आहे. त्यांच्याकडून योग्य प्रेम आणि आदर मिळाला आहे' असंही पुरी यांनी सांगितलं.