Shah Rukh Khan on Lok Sabha Election 2024 : राज्यात 'लोकसभा निवडणूक 2024'च्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्याचं आज मतदान होणार आहे. दरम्यान बॉलिवूडचे (Bollywood) अनेक सेलिब्रिटी चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. यात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचादेखील समावेश आहे. शाहरुखने आपल्या खास अंदाजात चाहत्यांना मत देण्याचं आवाहन केलं आहे. शाहरुखचा सोशल मीडियावर (Social Media) मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच त्याने बोटाला शाई लागण्याआधी आपल्या चाहत्यांना आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मतदान करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे, असं म्हणत शाहरुखने चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. दरम्यान बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेदेखील चाहत्यांना आपल्या खास शैलीत मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.


शाहरुखचं चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन 


शाहरुख खानने X (ट्वीट) करत लिहिलं आहे,"भारत देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी या सोमवारी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडुया आणि देशाचे हित जाणून घेऊन मतदान करूया. मतदान करण्याचा प्रचार करा". शाहरुख खानआधी सलमान खान, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 






शाहरुख खानचा 'जवान' (Jawan) हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील एका सीनमध्ये शाहरुख खान मतदानाबद्दल एक जबरदस्त भाषण करताना दिसून आला होता. शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. शाहरुखचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंती स उतरला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली. 


मुंबईकरानों मतदान करा : शिल्पा शेट्टी


शिल्पा शेट्टीने व्हिडीओ शेअर करत मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. अभिनेत्री म्हणाली,"मी तुम्हा सर्व मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन करते. कृपया मतदान केंद्रात जाऊन मत द्या. मतदान करणं तुमचा हक्क असून त्याचा फायदा घ्या". 






युथ आयकॉन आयुष्मान खुराना यांचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन


युथ आयकॉन आयुष्मान खुरानाने महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. व्हिडीओ शेअर करत आयुष्मान म्हणाला,"मित्रांनो, मतदानाची वेळ आली आहे. होय, लोकसभा निवडणूक टप्प्याटप्प्याने होत आहे आणि आता तुमची पाळी आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे कारण कोणते नेते देशाला योग्य दिशेने नेतील हे तुम्ही ठरवाल. तुमचे मत तुमचा आवाज आहे. म्हणून मतदान करा आणि तुमचा आवाज दाखवा, कारण एकत्रितपणे आपण आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. मतदान हे आपले कर्तव्य आहे. लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी होऊया. जय हिंद!”


अमिताभ बच्चन काय म्हणाले?


अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. बिग बी म्हणाले,"मतदान करण्याचा आजचा दिवस आहे. सर्वांनी नक्की मतदान करा. पाच वर्षांनी आजचा दिवस येत आहे. हा दिवस दररोज येत नाही. आज नवी सुरुवात करण्याचा दिवस आहे. मतदान करणं आपलं कर्तव्य आहे".






संबंधित बातम्या


Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...