मुंबई : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाने दिली आहे. शनिवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवून आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


हिंदी चित्रपटसृष्टीचे ट्रॅजेडीकिंग अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डिहायड्रेशनच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.

दिलीप कुमार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना सध्या ताप नसून श्वास घेण्यासाठीही अडचण नाही. ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अन्न घेत आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे उपाध्यक्ष अजय कुमार पांडे यांनी दिली.