Salil Kulkarni Show : सलील कुलकर्णीने (Salil Kulkarni) 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. गायक, संगीतकार सलील कुलकर्णीने त्याच्या संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. सलीलच्या गाण्याचा, संगीताचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. कोरोनामुळे मात्र प्रेक्षकांना सलीलच्या कार्यक्रमांपासून दूर राहावे लागले होते. सलीलच्या कार्यक्रमांची प्रेक्षकदेखील प्रतीक्षा करत होते. अशातच प्रेक्षकांचा विचार करत सलील कुलकर्णीने एक खास निर्णय घेतला आहे. सलील कुलकर्णी ज्येष्ठ मंडळींना आनंदाचे संगीतमय क्षणाचा आनंद देणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिने-नाट्यगृहात जाऊन कार्यक्रम बघणे हे ज्येष्ठ नागरिकांसाठी अवघड आहे. हीच बाब लक्षात घेऊन सलीलने ज्येष्ठ मंडळींसाठी त्यांच्या घरी जाऊन कार्यक्रम करण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील माहिती देत सलीलने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.
त्या पोस्टमध्ये सलीलने लिहिले आहे, "आपल्याकडे अनेक वर्ष गाण्याच्या उत्तमोत्तम मैफिली ऐकणारे अनेक रसिक आहेत. त्यांच्यापैकी काही जणं आता वयोमानानुसार घराबाहेर पडू शकत नाहीत. अगदी काल -परवा सुद्धा कार्यक्रमांत भेटणारे अनेक रसिक बोलता बोलता सांगत होते की, आमचे आई-बाबा, मावशी, काका पूर्वी तुमच्या मैफिलीला नक्की यायचे. पण आता ते थकले आहेत किंवा आजारी आहेत. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाही. प्रत्यक्ष (लाईव्ह ) गाणं ऐकणं या गोष्टीचे महत्वं किती आहे हे आपल्या सगळ्यानांच आताच्या काळाने दाखवून दिले आहे. त्यामुळे या ज्येष्ठ मंडळींना नाट्यगृहापर्यंत येता येणार नाही. पण मी त्यांना भेटून अर्धा तास गाणी नक्की ऐकवू शकतो".
Satyameva Jayate 2 Song Kusu Kusu: नोरा फतेहीच्या बेली डान्सने प्रेक्षकांना केले थक्क
सलीलने पुढे लिहिले आहे, "त्यामुळे डिसेंबरपासून ज्या घरात असे रसिक आजी आजोबा आहेत ज्यांना आता कार्यक्रमाला येता येत नाही त्यांच्या घरी येऊन त्यांची सेवा म्हणून, त्यांना भेट म्हणून काही गाणी ऐकवायची इच्छा आहे. महिन्यातून किमान एखाद्या जोडप्याला किंवा ग्रुपला असा आनंद देऊ शकलो तर खूप समाधान मिळेल. ज्यांना असं मनापासून वाटतं की माझ्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना गाणी ऐकायची ओढ आहे आणि त्यांना खरोखर शक्य नाहीत्यांनी musicdirectorsaleel@gmail.com
वर संपर्क साधा."
सलीलच्या अनोख्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. अनेक कलाकार मंडळीदेखील त्याच्या निर्णयाचं कौतुक करताना दिसून येत आहेत. ज्येष्ठ मंडळींसाठी सलीलचा हा निर्णय नक्कीच आनंदाचे संगीतमय क्षण देणारा ठरणार आहे.