मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पाच दिवसांपूर्वी मुंबईतील खारमधल्या पी डी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज दुपारी 12.45 वाजता त्यांना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयातून वांद्र्यातील पाली हिलमधल्या घरी सोडण्यात आलं. यावेळी पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत होत्या.
रुग्णालयातून निघताना सायरा बानो यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, "दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसातील पाणी पूर्णत: काढलं आहे. चांगले उपचार आणि विश्रांतीनंतर त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. अँटी बायोटिक्स देण्याचा आणि सर्व प्रकारची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थना कामी आली. यापुढेही त्यांच्यासाठी प्रार्थना कराल. त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार."
98 वर्षीय दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसातून पाणी काढण्यासाठी बुधवारी (9 जून) दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला 'प्ल्यूरल एस्पिरेशन' म्हटलं जातं. ही शस्त्रक्रिया मुख्यतः फुफ्फुसात जमा झालेला कफ, श्वास घेण्यास येणाऱ्या अडचणी आणि छातीतील वेदना दूर करण्यासाठी केली जाते.
श्वास घेण्यास त्रास आणि ऑक्सिजन पातळी घसरल्याने त्यांना रविवारपासूनच सातत्याने ऑक्सिजन दिला जात आहे. परंतु त्यांच्यावर सामन्य वॉर्डमध्येच उपचार सुरु होते. मात्र बुधवारी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या ट्विटर हॅण्डलवरुनही देण्यात आली. त्यात म्हटलं आहेत. "तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनांमुळे दिलीप कुमार रुग्णालयातून आपल्या घरी जात आहेत. तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि स्नेह यामुळे कायमच दिलीप साहेबांचं मन भरुन येतं."
संबंधित बातम्या