मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आज 98 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना ट्वीटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आज माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस असून त्यांच्या उत्तम आरोग्यसाठी मी प्रार्थना करते, असे ट्वीट लता मंगेशकर यांनी केलं आहे.
काय आहे लता मंगेशकर यांचे ट्वीट
"नमस्कार, आज माझा मोठा भाऊ दिलीपकुमार यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते."
दिलीपकुमार यांचा वाढदिवस कुटुंबीय दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दोन भावांचे निधन झाल्याने कुटुंबीय दुःखात आहेत. त्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारचा उत्सव होणार नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे.
दिलीपकुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो म्हणाल्या, की सेलिब्रेशनचा कोणताही प्लॅन नाही. "अहसान भाई आणि अस्लम भाई यांनी सोडून जाण्याने आम्ही दुःखात आहोत. साहेबही (दिलीप कुमार) त्यांच्या वाढदिवसासाठी कधीही प्लॅन करत नाही. मित्र आणि शुभचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांना या दिवसाची आठवण येते. लोकांनी पाठवलेले पुष्पगुच्छ ते ड्रॉईंग ठेवतात.
यापूर्वी सायरा बानो यांनी या आठवड्यात दिलीपकुमार यांच्या आरोग्याविषयी माहिती दिली होती. दिलीप कुमार खूप कमकुवत झाले आहेत, पण प्रकृती सुधारत आहे. “आजचा दिवस रंजक होता, मात्र त्यांच्यासाठी नाही. सर्वांचे प्रेम आणि कौतुक पाहून ते प्रभावित झाले आहेत. कोणत्याही पुरस्कारापेक्षा ते आपल्या चाहत्यांच्या प्रेमामुळे अधिक भावूक होतात.
यापूर्वी आम्ही दिलीप साहेबांचा वाढदिवस खूप उत्साहात साजरा करायचो. त्यांचे सर्व चाहते घरी येऊन त्यांना भेटायचे. दिलीप साहेबांना ते थोडे त्रासदायक होते. असे असूनही, ते सर्वांना भेटायचे आणि सर्वांना चांगले भोजन मिळावे यासाठी प्रयत्न करायचे, अशी आठवण सायरा बानो यांनी सांगितली.
संबंधित बातमी :
"दिलीप कुमार थकले, त्यांच्यासाठी प्रार्थना करा"; पत्नी सायरा बानो यांची माहिती