Laxmikant Berde Birth Anniversary: 'लक्ष्या' अर्थात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा आज जन्मदिन.  मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदवीर अशी त्यांची ओळख  होती. लक्ष्मीकांत बेर्डे  यांचे एव्हग्रीन चित्रपट पाहून आजही प्रेक्षक खळखळून हसतात. 26 ऑक्टोबर 1954 रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म झाला. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. मराठीचं नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांनी विशेष ओळख निर्माण केली. त्यांचे चित्रपटातील डायलॉग्स, कॉमेडी टायमिंग आणि हटके शैली पाहून आजही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येते. विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 16 डिसेंबर 2004 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काही मुलाखतींमध्ये त्यांच्या जीवनात आलेल्या खडतर प्रसंगांबाबत सांगितलं होतं. 


विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सांगितली होती स्ट्रगल स्टोरी 


एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांबाबत सांगितलं होतं. ते म्हणाले होते, 'यशाच्या शिखरावर असताना थोडी थंडी वाजते पण प्रेक्षकांच्या मायेची एवढी उब आहे की, ही थंडी काहीच वाटत नाही. मी रस्त्यावर लॉटरीची तिकीटं विकायचो. दिवाळीला उटणं विकायचो तसेच मी उदबत्ती देखील विकली आहे. मला तेव्हा चांगले कपडे घालायची हौस होती. मग कुठून पैसे आणायचे? असा प्रश्न पडायचा. मग मी स्वत:च्या कमाईनं हे सर्व करुन कपडे घेत होतो.  लॉटरीची तिकीटं विकत असताना असं वाटलं नव्हतं की, माझा फोटो एकेदिवशी लॉटरीच्या तिकीटावर येईल.'


सांगितल्या आईच्या आठवणी
एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या आईच्या आठवणी सांगितल्या होत्या. 'आमच्या घरातील गरिबी मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर कधीच पाहिली नाही. सतत हसत राहणारी ही माझी आई आहे. तिच्या पोटी माझा जन्म झाला हे मी माझं भाग्य समजतो. मी लहानपणापासूनच ठरवलं होतं की, दु:ख असलं तरी ते मनात ठेवायचं आणि नेहमी हसत राहायचं आणि लोकांना हसवायचं. त्यामुळे विनोद हा माझ्या अंगात निर्माण झाला. '


लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हिट चित्रपट 


धूमधडाका, गडबड घोटाळा,दे दणादण, अशी ही बनवाबनवी, धडाकेबाज, आयत्या घरात घरोबा या हिट चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले. त्यांनी मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. तसेच त्यांच्या टुरटुर आणि शांतेचं कार्टं चालू आहे या नाटकांमधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Abhinay Berde : बाबा काय बोलू? कशी सुरुवात करू?... अभिनय बेर्डेचा लक्ष्मीकांत बेर्डे यांना भावूक कॉल, व्हिडीओ होतोय व्हायरल