Lata Mangeshkar First Income Story : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी अखेरचा श्वास घेतला असून आज त्यांची पहिली पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जगभरातील चाहत्यांसह मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. लता मंगेशकर यांची लहान बहीण उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांनीदेखील एका मुलाखतीत लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
एका मुलाखतीत उषा मंगेशकर म्हणाल्या,"लता दीदी खरं तर आमची मोठी बहीण होती. पण माझ्यासाठी ती अगदी आईसारखीच होती. तिने माझा खूप चांगला सांभाळ केला आहे. मी सहा वर्षांची असताना लता दीदीने पहिला सिनेमा साईन केला होता. प्रत्येक कार्यक्रम, रेकॉर्डिंग आणि सिनेमाच्या शूटिंगला ती आम्हा भाऊ-बहिणींना सोबत घेऊन जात असे".
लता दीदींनी पहिल्या मानधनाचं काय केलं?
लता दीदी यांनी मिळालेल्या पहिल्या-वहिल्या कमाईचं अर्थात मानधनाचं काय केलं याबद्दल बोलताना उषा मंगेशकर म्हणाल्या,"लता दीदीला मिळालेलं पहिलं मानधन हे खूपच कमी होतं. पण तरीदेखील तिने आम्हा सर्व भावंडांसाठी कपडे विकत घेतले. त्यावेळी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण लती दीदीने कधीच या गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही. वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी दीदीच्या खांद्यावर आली".
लता दीदींचं पहिलच गाणं सुपरहिट!
लता मंगेशकर यांनी 'आयेगा आने वाला' या सिनेमासाठी पहिल्यांदा गाणं गायलं. त्याचं पहिलच गाणं सुपरहिट ठरलं होतं. अनेक मोठ-मोठ्या संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं आहे. जयदेवजी हे त्यांचे आवडते संगीत दिग्दर्शक होते. आरडी बर्मन, नौशाद साहेब आणि सज्जाद हुसैन यांच्यासोबत गाणं गायला त्यांना आवडायचे.
उषा मंगेशकर म्हणाल्या,"गाण्याच्या सरावासाठी उर्दू भाषेचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे, असं लता दीदींना वाटलं आणि त्यांनी उर्दू भाषा शिकून घेतली. हिंदी, मराठी, इंग्रजी, बंगाली, उर्दू अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये लता दीदी यांनी गाणी गायली आहेत. 'जय संतोषी मॉं' या सिनेमातील लता दीदींनी गायलेलं गाणं खूप लोकप्रिय झालं होतं".
उषा मंगेशकर पुढे म्हणाल्या,"लता दीदीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची प्रचंड चर्चा झाली आजही होते. मला अनेकदा विचारलं जातं तू लता दीदीची लाडकी बहीण होती. तर तुमच्यात कधी याविषयावर बोलणं झालं होतं का? पण आम्ही कायम लता दीदीच्या विचारांचा आदर केला आहे.
दीदीच्या निधनाने आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला होता. पण दीदी आपल्यासोबत नाही असं मला कधीच वाटत नाही".
संबंधित बातम्या