'त्या' संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2016 08:01 AM (IST)
मुंबई : आर्ची-परशाचा सैराट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पण या सिनेमातील एका संवादामुळे सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. 'सैराट'मधील परशा आणि शिक्षक यांच्यात झालेल्या संवादात आक्षेपार्ह वाक्य होतं, असं सांगत सिनेनिर्माता प्रणिता पवार यांनी वकिलामार्फत नागराज मंजुळे यांना नोटीस पाठवली आहे. या संवादामुळे स्त्री-जातीच्या आणि समाजाच्या भावना दुखावल्याचं नोटीसमध्ये म्हटलं आहे. नागराज मंजुळेंनी माध्यमासमोर येऊन समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करु, असा इशारा पवार यांनी दिला आहे. परशाला कॉलेजातून काढल्याचं शिक्षक सांगतात. त्यावेळी परशा आणि शिक्षक यांच्यात झालेल्या संवादामुळे स्त्रियांच्या भावना दुखावल्याचा आरोप प्रणिता पवार यांनी केला आहे.