मुंबई : अभिनेता वरुण धवनला त्याच्या एका फॅनचा इतका मनस्ताप झालाय की त्याला अखेर पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली. फॅन असलेली महिला वारंवार व्हॉट्सअॅप आणि फोन करुन त्याला त्रास देत होती. मात्र वरुण नाराज झाल्याने या महिला फॅनने आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे वरुणने या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे.

मेसेज पाठवणाऱ्या महिलेची आत्महत्येची धमकी
आपल्या तक्रारीत वरुण धवन म्हणाला की, "ही महिला सतत्याने व्हॉट्सअॅपवर मेसेज करत असे. यामुळे वैतागून तिचा नंबर ब्लॉक केला. यानंतर मला अनोळखी नंबरवरुन कॉल आला. हा कॉल महिला फॅनचा होता. व्हॉट्सअॅप मेसेजचं उत्तर न दिल्यास आत्महत्या करेन अशी धमकी तिने दिली.

तिच्या त्रासाला कंटाळलेल्या वरुणने आपल्या वकिलाच्या कायदेशीर सल्ल्यानंतर याची माहिती जुहू पोलिसांनी दिली. जुहू पोलिसांनी त्याला सांताक्रूझ पोलिसात तक्रार करण्यास सांगितलं. कारण त्याचं घर सांताक्रूझ पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतं.

सायबर पोलिसांकडे तपास
वरुण धवनच्या लेखी तक्रारीनंतर सांताक्रूज पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 506 अंतर्गत तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे. शिवाय या प्रकरणाची तक्रार सायबर पोलिसांनाही पाठवण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारीनंतर ज्या नंबरवरुन कॉल आला होता, त्याचा तपास सुरु आहे. सध्या हा नंबर बंद आहे.