नवी दिल्ली : बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी आपचे नेते कुमार विश्वास यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कॉपीराईटचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवली असून विश्वास यांनी त्याचे 32 रुपये बिग बींना दिले आहेत.

अमिताभ बच्चन यांचे पिता, प्रख्यात कविवर्य हरिवंशराय बच्चन यांच्या कविता परवानगी न घेता वापरल्याचा ठपका विश्वास यांच्यावर ठेवला आहे. या व्हिडिओतून कुमार विश्वास यांनी दिग्गज हिंदी कवींना सलाम केला आहे. विश्वास यांनी हा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केला असून सोशल मीडिया साईट्सवर शेअर केला आहे.

'हे कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन आहे. कायदेशीर कारवाई करण्यात येईल' या आशयाचं ट्वीट बिग बींनी मंगळवारी केलं होतं. 24 तासात व्हिडिओ डिलीट न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बच्चन यांच्याकडून बजावण्यात आली. त्याचप्रमाणे यातून जमा झालेल्या रकमेचा हिशोबही बिग बींनी कुमार विश्वास यांच्याकडे मागितला.

'त्या व्हिडिओतून मी ज्या हिंदी कवींना आदरांजली वाहिली, त्यांच्या कुटुंबीयांनी कौतुक केलं, फक्त बच्चन यांनीच लिगल नोटीस पाठवली. त्यामुळे मी तो व्हिडिओ यूट्यूबवरुन डिलीट करत आहे. त्या व्हिडिओतून झालेली 32 रुपयांची कमाई बच्चन यांना देत आहे' असं विश्वास यांनी म्हटलं.