कोलकाता : नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यावर आधारित डॉक्युमेंट्रीला सीबीएफसी अर्थात केंद्रीय
चित्रपट प्रमाण मंडळाने कात्रीत धरलं आहे. 'आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन' या माहितीपटातून गाय, गुजरात यासारखे शब्द वगळण्याची सूचना दिग्दर्शकाला देण्यात आली आहे.
दिग्दर्शक आणि अर्थतज्ज्ञ सुमन घोष 'आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन' ही डॉक्युमेंट्री कोलकातामध्ये रिलीज करणार होते. नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या आयुष्यावर आधारित या डॉक्युमेंट्रीतून गाय, गुजरात, हिंदू भारत, भारताचा हिंदुत्ववादी विचार हे शब्द काढून टाकण्यास सीबीएफसीने सांगितलं आहे.
एक तासाच्या या डॉक्युमेंट्रीचे 2002 आणि 2017 असे दोन भाग आहेत. मंगळवारी सीबीएफसीच्या प्रादेशिक कार्यालयात तिचं स्क्रीनिंग करण्यात आलं. मात्र या डॉक्युमेंट्रीतून गाय, गुजरात, हिंदू भारत, भारताचा हिंदुत्ववादी विचार हे शब्द 'बीप' वापरुन काढले गेले, तरच 'U/A' सर्टिफिकेट देण्यात येईल, असं सीबीएफसीने सांगितलं.
दिग्दर्शक सुमन घोष यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे. मात्र डॉक्युमेंट्रीच्या रिलीजबाबत संदिग्धता कायम आहे. देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य करताना अमर्त्य सेन यांनी गाय,
हिंदू भारत यासारख्या शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे यावर दिग्दर्शक काय भूमिका घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.