Dharmaveer 2 : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तुफान गाजला. आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या शुटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय एकनाथ शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या शुभारंभादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की,"धर्मवीर 2' या सिनेमात मी मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे". 


'धर्मवीर 2' सिनेमाच्या शुभरंभादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"धर्मवीर स्व.आनंद दिघे यांचे संपूर्ण जीवन जगासमोर आणणाऱ्या टीमचे अभिनंदन. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. धर्मवीर स्व.आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्व स्तरातील घटकांचे कल्याण केले, ते सर्वांसाठी जगले, गोरगरिबांसाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले. सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्याचेच आम्हीही अनुकरण करीत आहोत".


"आनंद दिघे माझ्या पाठिशी" : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मी मुख्यमंत्री झालो यामध्ये दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि बाळासाहेबांचे विचार आहेत. सत्तेचा वापर सर्वसामान्य नागरिकांसाठी हीच त्यांची शिकवण होती. आम्ही त्याच मार्गावर आहोत. सरकार बनल्यापासून काही लोक सरकार पडणार म्हणत होते, आता ज्योतिषी थकले, आता मुख्यमंत्री बदलणार म्हणतात, 31 डिसेंबर तारीख देत आहेत. पण माझ्या पाठीशी आनंद दिघे होते. अयोध्या इथे पहिली चांदीची विट दिघे साहेब यांनीच पाठवली होती, काही लोक म्हणायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे, पण मोदी साहेबांनी मंदिर पण बनवले आणि तारीख पण सांगितली". 


"काही लोकांना सिनेमा खटकला, सिनेमा बघता बघता उठून गेले, काही लोकांना सिन आवडले नाहीत, पण आता काहीही असो, फायनल अथॉरिटी आपण आहोत. काही लोकांना अजीर्ण झाले, त्यांना गोळी दिली, इंजेक्शन पण दिले आणि ऑपरेशन पण केलं, एक वर्षापूर्वी मी डॉक्टर नसून ऑपरेशन केलं", असं एकनाथ शिंदे म्हणाले.


शिंदेंच्या उठावाची कहाणी दुसऱ्या भागात? 


एकनाथ शिंदे 'धर्मवीर 2' या सिनेमात मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या उठावाची कहाणी दुसऱ्या भागात उलगडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच उद्धव ठाकरे यांचं पात्र असणार की वगळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'धर्मवीर 2' सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे (Pravin Tarde) निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) दिघे साहेबांची भूमिका साकारणार असून अन्य कलाकरांची नावे मात्र गुलदसत्यात ठेवण्यात आली आहे.  एकंदरीतच 'धर्मवीर' सिनेमात कलाकारांची निवड, लेखन-दिग्दर्शन, अभिनय, संगीतासह सर्वच गोष्टी उत्तमप्रकारे जुळून आल्या होत्या. त्यामुळेच आता 'धर्मवीर 2'मध्येही त्याची पुनरावृत्ती होईल यात शंका नाही. 


संबंधित बातम्या


Dharmaveer 2 : हिंदुत्वाची व्याख्या बदलायला लावणारा 'धर्मवीर 2'; प्रवीण तरडेंची एबीपी माझाला माहिती