नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या आपल्या 'रॉक ऑन 2' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनच्या निमित्ताने होणाऱ्या प्रवासादरम्यान एक वेगळाच अनुभव श्रद्धाला आला. शिवाय, या अनुभवाची सध्या जोरदार चर्चाही सुरु आहे.
श्रद्धा कपूर 'यारों की बारात'च्या सेटवर 'रॉक ऑन 2' सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेली होती. मात्र, तिथल्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला श्रद्धाने स्टेजवर बोलावले आणि तेथील उपस्थितांना तिने त्या व्यक्तीची ओळख करुन दिली. एवढंच नव्हे, तर त्या व्यक्तीची गळाभेट घेऊन पुन्हा आपल्या जागेवर बसण्यास श्रद्धाने सांगितले.
ज्या व्यक्तीला श्रद्धाने स्टेजवर बोलावले होते, ती व्यक्ती काही वेळापासून श्रद्धाचा पाठलाग करत होती. श्रद्धा प्रमोशनसाठी ज्या ठिकाणी जात होती, तिथे ती व्यक्ती हजर राहत होती. यादरम्यान तब्बल 17 वेळा त्या व्यक्तीला श्रद्धाने पाहिले. अखेर 'यारों की बारात'च्या स्टेजवर बोलावून आपल्या या आगळ्या वेगळ्या चाहत्याचा तिने योग्य सन्मानही केला.
'रॉक ऑन 2' सिनेमात फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, पुरब कोहली, प्राची देसाई आणि श्रद्ध कपूर अशी कलाकार मंडळी प्रमुख भूमिकेत आहेत. 11 नोव्हेंबर रोजी सिनेमा रिलीज झाला असून, शुजात सौदागर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.