मुंबई : भव्य दिव्य सेट्स, व्हिएफक्सची कमाल आणि कलाकारांचा दमदार परफॉर्मन्स, बाहुबलीने वेड लावलं नसेल, असे क्वचितचा सापडतील. चित्रपटाच्या विक्रमी कमाईवरुनच बाहुबलीची क्रेझ लक्षात येईल. त्यामुळेच बाहुबली चित्रपटाबद्दल, कलाकारांबद्दल अनेकांना वाचायला आवडतं.


अनेकांना तर सिनेमातील प्रत्येक सीन, डायलॉग, व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. मग तो कटप्पा असो किंवा कालकेय, कुमार वर्मा असो किंवा शिवगामी देवीच्या हातातील बाळ. शिवगामी देवी बाळाला हातात घेऊन पाण्यात उभी असलेला सीन आहे. हे बाळ म्हणजे चिमुकला बाहुबली. पण या चिमुकल्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? हे बाळ मुलगा नसूल मुलगी आहे.

या मुलीचं नाव आहे अक्षिता. 'बाहुबली - द बीगिनिंग'मध्ये अक्षिता दिसली होती. अक्षिता आता अडीच वर्षांची आहे. पण सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी ती फक्त 18 दिवसांची होती.



बाहुबलीला अर्थात अक्षिताला शिवगामी देवी एका हातात पकडून पाण्यात उभी असलेलं थरारक दृश्य केरळच्या छलकुडी धबधब्यात चित्रीत केलं होतं.

अक्षिता ही केरळमधील निल्लेश्वरममध्ये राहणाऱ्या वाल्सन आणि स्मिता दाम्पत्याची मुलगी आहे. अक्षिताचे  वडील वाल्सन हे बाहुबलीच्या केरळमधील लोकेशनचे प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह होते. त्याचवेळी अक्षिताला या मोठ्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.

या सिनेमाच्या महत्त्वाच्या दृश्यासाठी दिग्दर्शक एस एस राजामौली आणि कला दिग्दर्शक साबू सायरिल  एक बाळ शोधत होते. त्यावेळी वाल्सन आणि त्यांची पत्नी स्मिताला विचारणा करुन अक्षिताची निवड केली. त्यावेळी अक्षिता केवळ 18 दिवसांची होती. अक्षिता असलेल्या दृश्यांचं चित्रीकरण पाच दिवसात पूर्ण झालं.



अक्षिता फक्त सिनेमातच दिसली नाही तर बाहुबलीच्या पोस्टरवरही ती झळकली होती. विशेष म्हणजे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी हे पोस्टर ट्वीट केलं होतं. तसंच 'बाहुबली - द कन्क्लुजन'मध्येही छोटी अक्षिता पाहायला मिळाली होती.

दिग्दर्शक, कलाकार यांच्या अथक मेहनतीने बाहुबली सिनेमा घडला आणि आज बाहुबलीने देशभरातील नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सिनेमाने कमाईच्या बाबतीत आता 1000 कोटी रुपयांच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.