मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आगामी 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमात अभिनेत्री फातिमा शेखही दिसणार आहे. मात्र या सिनेमात फातिमाला घेण्यासाठी आमिरने शिफारस केली, ही चर्चा सध्या रंगली आहे.


आमिरची पत्नी किरण रावनेच या चर्चेला आता पूर्ण विराम दिला आहे. केवळ आमिरमुळे नव्हे, तर फातिमाला भूमिका देण्यामागे निर्मात्यांचीही महत्वाची भूमिका आहे, असं किरण रावने म्हटलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत किरण रावने याबाबत माहिती दिली.



'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा यशराज बॅनरचा सिनेमा आहे. आणि या सिनेमाच्या कास्टिंगमध्ये आदित्य चोपडा, विजय कृष्ण आचार्य आणि आमिर खान या तिघांनी मिळून निर्णय घेतला. हा मोठा सिनेमा आहे, त्यामुळे निश्चितच फातिमाला विचारपूर्वकच भूमिका दिली असेल. शिवाय तिच्यात ती क्षमता आहे, त्यामुळेच तिला भूमिका मिळाली, असंही किरण रावने म्हटलं.

दरम्यान यापूर्वी फातिमालाही अनेकदा हा प्रश्न विचारण्यात आला आहे. मात्र तिने या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं होतं. अखेर किरण रावनेच या चर्चांना आता पूर्ण विराम दिला.



फातिमाने आमिरच्या 'दंगल' सिनेमात पैलवान गीता फोगाटची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या कामाचं आमिरसह अनेकांनी कौतुकही केलं होतं.

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमात आमिर आणि फातिमासोबत, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि जॅकी श्रॉफ हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. आमिर आणि बिग बी या सिनेमातून पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. कतरिनाने यापूर्वी 'सरकार'मध्ये बिग बींसोबत आणि 'धूम 3' मध्ये आमिरसोबत काम केलेलं आहे.