Kiran Mane:अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा  चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. प्रेक्षक जवान चित्रपटामध्ये शाहरुखची एन्ट्री होताच टाळ्या, शिट्ट्या वाजवत आहेत. या चित्रपटाचं अनेकजण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील नुकतीच  शाहरुखच्या जवान या चित्रपटाबद्दल नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.


किरण माने यांची पोस्ट


किरण यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'जवान'मध्ये शाहरूखच्या आवाजात एक सनसनीत शेर हाय, "उसूलों पे जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है... जो ज़िन्दा हों, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है !" हा शेर आजच्या परिस्थितीत लै लै लै मोलाचा संदेश देऊन जातो भावांनो. जवा-जवा आपल्यावर दडपशाहीचं सावट येतं, आपल्या पूर्वजांनी झगडून, लढा देऊन मिळवलेलं आपलं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं.आपल्यावर पिढ्या न् पिढ्या असलेल्या मानवतेच्या, समानतेच्या, बंधुभावाच्या संस्कारांवर घाला घातला जातो. तवा बिनधास्त नडायला पायजे, भिडायला पायजे.


शायरीच्या दुनियेत बेताज बाहशाह असलेल्या वसीम बरेलवींचा एक दिवस फोन वाजला, "हॅलो, वसीमजी, मी शाहरूख खान बोलतोय. तुमचा हा शेर मला कायम प्रेरणा देतो. यावेळी तो माझ्या सिनेमात वापरायला मला तुमची परवानगी हवीय." वसीमभाई म्हन्ले,"शाहरूख बेटा, तू मला आवडतोस. परवानगी देईन, पण एका अटीवर. हा शेर मी लिहून देईन, तसाच्या तसा सिनेमात तू तुझ्या आवाजात म्हणायचास." शाहरूखनं नम्रपणे हसून होकार दिला.दोन ओळींसाठी एवढा मोठ्ठा कलाकार स्वत: फोन करून विनयशीलतेनं परवानगी मागतो याचं बरेलवींना लैच नवल वाटलं. खरंतर ज्यांना शाहरूखचं अफाट वाचन, तिक्ष्ण बुद्धीमत्ता, विवेकी विचारसरणी, समाजभान याविषयी माहिती आहे, त्यांना या गोष्टीचं लै नवल वाटनार नाय. असे कलावंतच न डरता, मागे न हटता, पाठीचा कणा ताठ ठेवून जगतात.


नायतर बाकी आज आपल्या सिनेमाक्षेत्रात बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत वो. फायद्यासाठी व्यवस्थेचे पाय चाटत लाचार जगनार्‍या. जातीधर्मांत द्वेषाचं विष पसरेल असा इतिहासाचा विपर्यास करनारे सिनेमे काढनार्‍या.भ्रष्ट नेत्यांकडून फंडिंग उकळत प्रोपोगंडा फिल्मस् काढनार्‍या सुमार दर्जाच्या कलाकारांची मराठी-हिंदीत सद्दी आहे. अशा नट-दिग्दर्शकांची ठरवून 'हाईप' केली जाते. पात्रता नसताना अनेक सरकारी पुरस्कार, पदं देऊन प्रेक्षकांवर लादलं जातं. हे पाहून कवा-कवा निराशा यायची. अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत? असा प्रश्न पडायचा. पण प्रेक्षक वेडे नसतात. पितळ आनि सोनं, काच आनि हिरा यातला फरक कळतो त्यांना.. म्हणूनच त्यांनी 'जवान'ला ठरवून डोक्यावर घेतलं. शाहरूख खान नावाच्या अस्सल भारतीय कलावंताला भरभरून प्रेम देऊन प्रेक्षकांनी हे दाखवून दिलं की, बास झालं आता. आम्हाला मूर्ख समजू नका. 'हम ज़िन्दा है... और ज़िन्दा नज़र आना चाहते है !'






शाहरुखच्या 'जवान'  या चित्रपटात  नयनतारा,विजय सेतुपती,संजय दत्त, सुनील ग्रोव्हर, सान्या मल्होत्रा आणि एजाज खान यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 


संबंधित बातम्या:


Shah Rukh Khan: 'अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा!' किरण मानेंकडून शाहरुखचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले, 'नानावटी हॉस्पिटलमध्ये...'