Kiran Mane On Manoj Jarange : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विविध विषयांवर व्यक्त होत असतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी मनोज जरांगे उपोषण करत आहे. आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल किरण माने यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांनी लिहिलं आहे,"जरांगे पाटील... या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं. कारण व्सवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणाऱ्या व्यवस्थेला तो धाक दाखवण्याचं महान कार्य तुम्ही करत आहात. तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे".
किरण माने यांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव
मनोज जरांगे यांच्याविषयीची किरण माने यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, समाजाला आज त्यांची गरज आहे, एक मराठा लाख मराठा, एका सामान्य माणसाचं असामान्य कर्तृत्व म्हणजेच मनोज जरांगे पाटील, लाख आणि लाखांचा पोशिंदा दोघांची गरज आहे, मनोज जरांगे पाटील यांची स्वत:ची काळजी घ्यावी, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
किरण माने साताऱ्यातील आंदोलनात सहभागी झाले होते. साताऱ्यातील आंदोलनकर्त्यांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी एक पोस्ट लिहिली होती. किरण माने म्हणाले होते,"मराठा आरक्षणाचा मुद्दा आता 'करो या मरो' या स्टेजवर आला आहे.माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या रक्तात धैर्य, चिकाटी आणि हिंमत आहे ! योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीचा वापर करत पुढं जाऊया. उतावळेपना करायच्या आधी कुटूंबाचा विचार करा. आपण आपल्या समाजातल्या गोरगरीबांच्या पुढच्या पिढ्यांसाठी लढतोय. आरक्षण मिळणार... आपण मिळवणारच...कुणाचा बाप ते थांबवू शकत नाही..जय जिजाऊ...जय शिवराय...जय भीम..एक मराठा लाख मराठा".
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस
मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या सहा दिवसांत त्यांनी अन्नाचा कण देखील घेतला नाही. तसेच, दोन-तीन वेळा विशेष विंनतीवरून पाण्याचा घोट घेतला आहे. त्यामुळे आता त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तर, जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. तर, या सर्व पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी गावात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या