Kiran Mane On Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा देशभरात चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाज उपोषण करत आहे. साताऱ्यातील साखळी उपोषणात अभिनेते किरण मानेदेखील (Kiran Mane) सहभागी झाले होते. साताऱ्यातील आंदोलनकर्त्यांबरोबरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


किरण माने यांनी साताऱ्यातील आंदोलनकर्त्यांबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं आहे,"साताऱ्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे. जरांगे पाटलांना सपोर्ट म्हणून. सगळ्या पाहुणेमंडळींबरोबर थोडा वेळ बसलो. त्यात कोडोलीतले 75 वर्षांचे तात्या सावंत दोन दिवस झाले उपोषणाला बसलेत. त्यांना 'तब्येतीची काळजी घ्या' अशी विनवणी केली पण ऐकायला तयार नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता 'करो या मरो' या स्टेजवर आला आहे. लढा द्यायलाच हवा, पण असे वयोवृद्ध लोक मैदानात उतरल्यामुळं त्यांच्या प्रकृतीची खूप काळजी वाटायला लागली आहे. आज एका तरण्याबांड भावानं आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी एकानं स्वत:ला संपवलं होतं. एकानं गाड्या फोडल्या... इतकं इमोशनल होऊन कसं चालंल माझ्या भावांनो".



जरांगे पाटलांच्या धैर्याला आणि चिकाटीला सलाम :  किरण माने


किरण माने यांनी लिहिलं आहे,"आपली ताकद मोठी आहे. शांततेत काम केलं तरी पुरेसं आहे. वाघाच्या अस्तित्वात आणि डरकाळीत दहशत असते. समोरचा कितीही माजलेला असला तरी एका डरकाळीत जाग्याव थरथरला पाहिजे. कशाला उतावीळ होऊन टोकाचे निर्णय घ्यायचे? जरांगे पाटलांच्या धैर्याला आणि चिकाटीला सलाम. यश मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाय आपला मराठा गडी, असा आतातरी पूर्ण विश्वास वाटतोय! फक्त अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही गोष्टींची काळजीही वाटते आहे. असो. आपण सध्या तरी फक्त 'पॉझीटिव्ह' विचार करूया. जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे रहाणं गरजेचं आहे". 


किरण माने यांनी पुढे लिहिलं आहे,"माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या रक्तात धैर्य, चिकाटी आणि हिंमत आहे ! योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीचा वापर करत पुढं जाऊया. उतावळेपना करायच्या आधी कुटूंबाचा विचार करा. आपण आपल्या समाजातल्या गोरगरीबांच्या पुढच्या पिढ्यांसाठी लढतोय. आरक्षण मिळणार... आपण मिळवणारच...कुणाचा बाप ते थांबवू शकत नाही..जय जिजाऊ...जय शिवराय...जय भीम..एक मराठा लाख मराठा".


किरण मानेंच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव


किरण मानेंची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. जय जिजाऊ जय शिवराय, जाहीर पाठिंबा सर, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, समाजाशी नाळ असलेले कलाकार...अभिमान आहे दादा, एक मराठा लाख मराठा, आत्महत्या करून कोणताही लढा देता येत नाही, त्यासाठी जगावं लागतं, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Kiran Mane: "कुणी कितीही भडकवायचा प्रयत्न करू दे, आपण तोल जाऊ द्यायचा नाही"; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष