दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर स्वरा भास्करने आपली भूमिका मांडली. देशभरात कथित नक्षलसंबंधांवरुन जे अटकसत्र सुरु आहे, त्यासोबत स्वरा भास्करचं हे वक्तव्य जोडलं जात आहे.
''महात्मा गांधींची हत्या करण्यात आली तेव्हा सगळा देश शोकसागरात बुडाला होता. तरीही काही लोक असे होते ज्यांनी आनंद व्यक्त केला, उत्सव साजरा केला. ते लोक आज सत्तेत आहेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात टाकणार का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे,'' असं स्वरा भास्कर म्हणाली.
''सध्या काहीही झालं की तुरुंगात टाका असं म्हटलं जातं. रक्तपिपासू समाज होणं ही चांगली बाब नाही,'' असंही स्वरा म्हणाली. ''खालीस्तानचा मुद्दा चालू असताना भिंद्रनवाले यांनाही काही लोक संत म्हणत त्या सगळ्यांनाही उचलून तुरुंगात टाकणार का?'' असाही प्रश्न स्वरा भास्करने उपस्थित केला.
दरम्यान, स्वरा भास्करच्या वक्तव्यांमुळे वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही कठुआ बलात्कार प्रकरणी जेव्हा तिने संताप व्यक्त केला, तेव्हाही तिला टीकेचा सामना करावा लागला होता. स्वराकडून केवळ एकतर्फी मतं माडलं जातं, असा आरोप ट्रोलर्सकडून करण्यात आला होता.