मुंबई : केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी सुरु केलेलं फिटनेस चॅलेंज चिमुरड्यांपर्यंत पोहचल्याचं दिसत आहे. बॉलिवूडमधील कलाकारांपाठोपाठ त्यांची चिमुकली मुलंही या चॅलेंजमध्ये सहभागी होत आहेत. अभिनेता रितेश देशमुखचा धाकटा मुलगा राहीलने हे चॅलेंज स्वीकारत आणखी काही स्टारकिड्सनाही आव्हान दिलं आहे.

रितेश देशमुखने आपला धाकटा मुलगा राहीलला फिटनेस चॅलेंजसाठी नॉमिनेट केलं होतं. आपल्या वडिलांनी दिलेलं आव्हान राहीलने पूर्ण केलं. रितेशची पत्नी म्हणजेच अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुखने राहीलचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.

'राहीलने त्याच्या बाबांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं. तो बच्चा गँगला आव्हान देत आहे. #बच्चेफिटतोदेशफिट' असं ट्वीट जेनेलियाने केलं आहे.

सलमान खानचा भाचा म्हणजे अर्पिता आणि आयुष शर्मा यांचा मुलगा अहील, सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर, करण जोहरची जुळी मुलं रुही आणि यश, तसंच तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य यांना राहीलने नॉमिनेट केलं आहे. या आव्हानाला ही स्टारकिड्स कसं उत्तर देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


राजवर्धन राठोड यांनी आरोग्याबाबत जागरुकतेसाठी फिटनेस चॅलेंज सुरु केलं होतं. यामध्ये विराट कोहली, मेरी कोम, सायना नेहवाल, अनुष्का शर्मा, हृतिक रोशन, नरेंद्र मोदी यासारखे विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत.