Kedar Shinde: 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' (Jai Jai Maharashtra Majha) या गीताचं दुसरं आणि तिसरं कडवं राज्य गीत म्हणून गायलं जाणार आहे. वेळेचा विचार करता गीत मोठं होत असल्यानं निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाच्या समोर राज्य गीताचा बोर्डही लावण्यात येणार आहे. एक मिनिट 45 सेकंदाचे हे राज्य गीत असणार आहेत. आता या निर्णयावर केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले केदार शिंदे?
केदार शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मला वाटतं की, राज्यगीत किंवा राष्ट्रगीताला काही प्रोटोकॉल असतात. आधी आपण राज्यगीत नाही म्हणून टाहो करत होतो. आता राज्यगीत आपल्याला मिळालं तर ते आपल्या प्रमाणे असावं, असं होऊ शकत नाही. किती सेकंदात किंवा किती मिनीटांमध्ये गाणं असावा हा प्रोटोकॉल असेल तर त्यामध्ये मला काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा आपण राज्यगीत गाऊ, तेव्हा तीन कडवी गाऊयात. तीनच कडवी गायली जावीत, असा अट्टाहास नसावा.'
केदार शिंदे यांच्या आगामी चित्रपटातही असणार हे गीत
महाराष्ट्र शाहीर या आगामी चित्रपटामध्ये 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत असणार आहे, अशीही माहिती केदार शिंदे यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, अजय-अतूल हे या गाण्याला संगीतबद्ध करणार आहेत. तर अजय गोगावले हे गाणं गाणार आहेत. 28 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी मुख्य भूमिका साकारणार आहे.
'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गाण्याला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी शाहीर साबळे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. केदार शिंदे यांनी या पोस्टमध्ये लिहिलं,"माझे खरे हीरो... शाहीर साबळे. बाबा तुमच्या जन्मशताब्दी वर्षात पुन्हा एकदा तुमचा झंझावत निर्माण होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार 'जय जय मराराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र गीत आता राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं आहे".
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, त्यावेळी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत राजा बढे यांनी लिहिलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: