कतरीना आणि सिद्धार्थकडून विमानतळ सुरक्षेचे नियम धाब्यावर
एबीपी माझा वेब टीम | 07 Sep 2016 03:49 AM (IST)
नवी दिल्ली: अभिनेत्री कतरीना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 'बार बार देखो' चित्रपटाच्य प्रमोशनसाठी विमानतळाच्या सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले. या दोघांनीही सोमवारी रात्री दिल्ली विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी एअर इंडियाचे तिकीट बूक केले होते. चेकिंगनंतर हे दोघेही जेव्हा सेक्युरिटी होल्ड परिसरात दाखल झाले, तेव्हा सुरक्षेचे नियम पायदळी तुडवत चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली. विमानतळ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 9.40 वाजण्याच्या सुमारास अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या चार सहकाऱ्यांसह इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलमध्ये दाखल झाले. येथून या सर्वांनी मुंबईला जाण्यासाठी एअर इंडियाचे एआय-317 विमानाचे तिकीट खरेदी केले. तपास अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर हे दोघे आंतरराष्ट्रीय सेक्यूरिटी होल्ड परिसरातील ड्यूटी शॉपमध्ये पोहोचले. इथे आल्यानंतर कोणाचीही परवानगी न घेता, या दोघांनीही आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली. बराचवेळ बोर्डिंग अधिकाऱ्यांनी कॉल करूनही त्यांनी विमानात प्रवेश न केल्याने या दोघांना डीबोर्ड करून अधिकाऱ्यांनी विमानाला प्रस्थान करण्याच्या सुचना दिल्या. विमानतळाच्या बाहेर पडल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर चिडलेल्या सुरक्षा एजन्सीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली.