मुंबई : तरुणांचा आवडता अभिनेता कार्तिक आर्यन आणि कृती सॅननच्या आगामी 'लुका छुप्पी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या 'लुका छुप्पी' या चित्रपटामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. मराठीतले नावाजलेले दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. 'लुका छुप्पी'द्वारे कार्तिक आणि कृती ही फ्रेश जोडी आपल्यासमोर येत आहे. हा एक रोमॅन्टीक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटातल्या जोडप्याला लिव्ह इनमध्ये रहायचे आहे. परंतु हे दोघेजण आपलं लग्न झालंय असं सांगून लिव्ह इनमध्ये राहतात. नंतर त्यांच्या या गोष्टीत दोघांच्या कुटुंबांची एन्ट्री होते. त्यानंतर मोठी धम्माल घडते. असं या चित्रपटाचं सिम्पल कथानक आहे. लक्ष्मण उतेकर या चित्रपटाद्वारे हिंदीत पदार्पण करत आहेत. याअगोदर उतेकर यांनी मराठीत 'टपाल' आणि 'लालबागची राणी' या दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. तसेच हिंदीत त्यांनी अनेक चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 'डिअर जिंदगी', 'इंग्लिश विंग्लिश', 'ब्लू', '102 नॉट आऊट', तेवर, या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. लुका छुप्पीमध्ये कार्तिक-कृतीसह अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.