मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी (30 जानेवारी) 'दी गांधी मर्डर' हा चित्रपट जगभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे जगभरात प्रदर्शित होणारा हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. चित्रपटाचे निर्माते लक्ष्मी आर. अय्यर याबाबत म्हणाले की, "आम्ही 'दी गांधी मर्डर' हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत हा देश चित्रपटांसाठी मोठे मार्केट आहे. परंतु आम्हाला आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांना चित्रपट प्रदर्शित करु नये यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. ज्यामध्ये आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्यादेखील दिल्या जात आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या टीमने हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे". करी त्रैदिया आणि युएई स्थित पंकज सहगल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येमागील वास्तविकता, त्याबाबत केलेला रिसर्च, फॅक्ट्स या सर्वांचा अभ्यास करुन 'दी गांधी मर्डर' हा चित्रपट बनवला आहे. अय्यर म्हणाले की, "भारतीय सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला गेल्या वर्षी मंजूरी दिली आहे. हा चित्रपट बनवताना आम्ही कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा केलेला नाही. भारतीयांना आम्ही सत्य सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे." धमक्यांबाबात सांगताना अय्यर म्हणाले की, "जे लोक धमक्या देत आहेत, मी त्यांना ओळखत नाही. परंतु धमकी देणारे लोक आम्हाला, आमच्या कुटुंबियांना ओळखतात.आमच्याबाबत त्यांना संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या धमक्यांची जास्त भीती वाटते. ते लोक प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नंबरवरुन फोन करतात.