'तैमूरच्या नावावरुन वादंग माजल्यानंतर सैफ घाबरला होता. तैमूरच्या जन्मावेळी मी हॉस्पिटलमध्येच होते. तैमूर नावामुळे खूप वाद होत असल्याचं सैफने मला सांगितलं. आम्हाला ट्रोल केलं जात असल्याचंही सैफ म्हणाला. सैफला तैमूरचं नाव बदलून फैज ठेवायचं होतं. फैज हे नाव जास्त रोमँटिक आणि काव्यात्मक असल्याचं सैफ म्हणाला होता.' असं करिना सांगते.
'मी सैफला ठाम नकार दिला. मी ठरवलं होतं, जर मुलगा झाला, तर तो लढवय्या असेल. तैमूर म्हणजे लोह. मी एका लोहपुरुषाला जन्म देणार. तैमूर नावाचा मला अभिमान आहे.' अशा शब्दात करिनाने आठवणींना उजाळा दिला.
लोकांसाठी नाही, तर त्याला शाळेत कोणी चिडवू नये, म्हणून मला त्याचं नाव बदलायचं होतं, असं सैफचं म्हणणं होतं.
तैमूरभोवती कायमच फोटोग्राफर्सचा गराडा पडलेला असतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळते. एकीकडे लोक तो सतत लाईमलाईटमध्ये असल्याने नावं ठेवतात, मात्र त्याचे फोटो पाहण्यासाठी उड्याही मारतात.
करिना कपूरने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात 20 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 वाजता तैमूरला जन्म दिला. 'तैमूर'चं नाव जाहीर केल्यानंतर टीकेची राळ उठली होती. तुर्की क्रूरकर्माच्या नावावरुन हे नामकरण झाल्याचं म्हटलं जात होतं.
'माझ्या बाळाचं नाव तुर्की राज्यकर्त्यावरुन ठेवण्यात आलेलं नाही. मला त्या राजाविषयी पूर्ण माहिती आहे. त्याचं नाव तिमूर होतं, माझ्या मुलाचं नाव तैमूर आहे. कदाचित नावाचा उगम एकच असेल, पण नाव सारखं नाही.' असं सैफ अली तैमूरच्या जन्माच्या महिन्याभरानंतर म्हणाला होता.
तैमूरचा अर्थ काय?
तैमूर हे पर्शियन भाषेतील अत्यंत जुनं नाव असल्याचं सैफ अली खानने सांगितलं होतं. तैमूरचा अर्थ लोह किंवा लोखंड. मला आणि करिनाला या शब्दाचा उच्चार आणि अर्थ भावला. आम्ही काढलेल्या असंख्य नावांपैकी तिला हेच सगळ्यात जास्त आवडलं. या नावाला वजन आहे, असं सैफने सांगितलं होतं.
माझ्या एका लांबच्या भावाचं नाव तैमूर आहे. मी त्याच्यासोबत लहानाचा मोठा झालो. माझ्या मोठ्या मुलीचं, म्हणजे साराचं नावही आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरुन ठेवलं होतं, अशी आठवणही सैफने सांगितली होती.