Kargil Vijay Diwas Movies : 'कारगिल युद्ध' (Kargil War) हे भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे युद्ध ठरले. आजच्या दिवशी 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 26 जुलै 1999 रोजी भारताने हे युद्ध जिंकले तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 'कारगिल विजय दिवस' (Kargil Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. या युद्धात 500 पेक्षा अधिक भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते. कारगिल युद्धाचा थरार अनेक बॉलिवूड सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. यात 'एलओसी कारगिल' (LOC: Kargil) ते 'शेरशाह' (Shershaah) अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. आज जाणून घ्या अशाच सिनेमांबद्दल...
1. धूप (Dhoop) : 'धूप' हा सिनेमा 2003 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अश्विनी चौधरीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. कॅप्टन अनुज नय्यर यांच्या मृत्यूनंतरची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली होती. अनुज नय्यर हे भारतीय लष्कराचे अधिकारी होते. या सिनेमात कॅप्टन अनुज यांचा त्याग दाखवण्यात आला आहे.
2. लक्ष्य (Lakshay) :
'लक्ष्य' हा सिनेमा 2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. फरहान अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात ऋतिक रोशन आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा थेट कारगिल युद्धावर आधारित नसला तर या युद्धातील काही घटना या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत.
3. एलओसी कारगिल (LOC Kargil) :
'एलओसी कारगिल' हा सिनेमा 2003 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जेपी दत्ता यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात संजय दत्त, सैफ अली खान, अजय देवगन, अभिषेक बच्चन, नागार्जुन, करीना कपूर, रानी मुखर्जी, रवीना टंडन महत्त्वाच्या भूमिकेत होते.
4. मौसम (Mausam) :
पंकज कपूर दिग्दर्शित 'मौसम' हा सिनेमा 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा पूर्णपणे कारगिल युद्धावर आधारित नसला तरी या सिनेमात युद्धाचा संदर्भ आहे. या सिनेमात शाहिद कपूर आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
5. गुंजन सक्सेना (Gunjan Saxena) :
'गुंजन सक्सेना' हा सिनेमा 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा वायुसेना अधिकारी गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित आहे. शरण शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून जान्हवी कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
6. शेरशाह (Shershaah) :
'शेरशाह' हा सिनेमा 2021 मधला ब्लॉकबस्टर सिनेमा होता. कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा कॅप्टन बत्रा यांच्या भूमिकेत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
संबंधित बातम्या