मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्याची कहाणी लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून 'करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी'मधून समोर येणार आहे. तिच्या बायोपिकचा ट्रेलर आज रिलीज झाला. रिलीजच्या काही तासातच सनीच्या बायोपिकच्या ट्रेलरला 16 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यावरुनच सनीचे चाहते तिच्या या बायोपिकची आतुरतेने वाट पाहत असल्याचं स्पष्ट होतं.

सनी लिओनी आपल्या भूतकाळातून बाहेर पडून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नशिब आजमावत आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग केले तर काही सिनेमांमध्ये अभिनयही केला आहे. आता वेब सीरिजमधून तिच्या आयुष्याची कहाणी उलगडणार आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला सनी एका मुलाखतीला जाताना दिसते. भारतात सनीवर जेवढं प्रेम केलं जातं तेवढाच तिचा तिरस्कार केला जातो, अशी तिची ओळख करुन दिली जाते. यानंतर ट्रेलरमध्ये तिचं बालपण दिसतं. ट्रेलरमध्ये सनीच्या कुटुंबाची आर्थिक चणचण दाखवली आहे. यामधून सनीने मार्ग कसा काढला, तिला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, हे दाखवण्यात आलं आहे.

करनजीत कौर वोहरा सनी कशी बनली याचा प्रवास सिनेमात दाखवला जाणार आहे. कॅनडात एका पंजाबी कुटुंबात करणजीतचा जन्म झाला होता. बायोपिकमध्ये सनी लिओनीच स्वत:ची भूमिका साकारणार आहे. तर सनीच्या बालपणीची भूमिका 14 वर्षीय रसा सौजनी साकारत आहे. 16 एप्रिलला ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर