मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने तिच्या कमेंटमध्ये आपल्यालाच टार्गेट केल्याचं शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला वाटत आहे. नुकतीच झालेली करीना कपूरची मुलाखत मीराला आवडली नाही. त्यामुळे मीरा आणि करीना यांच्या शीतयुद्ध सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.

काही दिवसांपूर्वीच्या एका मुलाखतीत मीरा म्हणाली होती की, "मला घरात राहायला आवडतं. माझ्या मुलीची आई असल्याचं आवडतं. बाळासोबत दिवसातला एक तास घालवायचा आणि कामासाठी निघून जायचं हे मला नकोय. मग मी तिला जन्मच का दिला. ती म्हणजे कुत्र्याचं पिल्लू नाही. मला आई म्हणून तिच्यासोबत राहायचं आहे.

शाहिद कपूरने मीराच्या या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. पण मीराच्या या कमेंटविरोधात सोशल मीडियावर अनेक नोकरदार मातांनी, महिलांनी नाराजी व्यक्त केली होती.

उशिरा का होईना, करीना कपूरने मीराला त्या वक्तव्यबाबत सडेतोड उत्तर दिलं आहे.

करीना म्हणाली की, "मी आई म्हणून कशी आहे, हे काही काळानंतर समजेल. आई बनण्याच्या अनुभवाबाबत किंवा तैमूरवर किती प्रेम करते हे मी गच्चीवर जाऊन आरडाओरडा करुन सांगू शकत नाही. कोणाची तुमच्याविषयी मत बनवतं, याचा आपल्यावर कायम दबाव असतो. पण यामुळे काहीच फरक पडत नाही. तुम्ही या सगळ्याला कसं सामोरं जातां, यावर ते ठरतं. प्रत्येक गरोदरपणाचा, प्रत्येक आईचा बाळासोबतचा 9 महिन्यांचा प्रवास आणि त्यानंतरचा प्रवास वेगवेगळा असतो. तुम्ही सगळ्यांना एका पारड्यात तोलू शकत नाही."

"बाळाला जन्म देताना मी काय विचार करत होते, कोणत्या परिस्थितीत होते हे कोणालाही माहित नाही. त्यामुळे माझ्याऐवजी कोणी कसा काय निर्णय घेऊ शकतं की, मी ड्रिप्रेस आहे किंवा डिलिव्हरीच्या 45 दिवसांनी पुन्हा कामावर जाऊ शकते. जर माझ्याबद्दलच असं बोललं जात असेल तर इतर महिलांचं काय?," असंही करीना म्हणाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, मातृत्त्वाबाबत करीना कपूरच्या या कमेंटमुळे मीरा फारच नाराज आहे. करीनाने मीराचं नाव घेतलं नाही, पण अप्रत्यक्षरित्या तिलाच टोमणा मारल्याचं म्हटलं जात आहे.