मुंबई : बॉलिवूडमधल्या जोडप्यांची एकदा ताटातूट झाली की दोघं एकमेकांचं तोंडही पाहणं पसंत करत नाहीत. उडता पंजाब चित्रपटात करिना कपूर आणि तिचा माजी प्रियकर शाहिद कपूर एकत्र दिसणार आहेत. मात्र एक्स बॉयफ्रेण्डबरोबर काम न करणं जुनाट कल्पना असल्याचं बिनधास्त मत करिना कपूरने व्यक्त केलं आहे.
ज्या व्यक्तीला आपण पूर्वी डेट केलं आहे, त्याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर सोबत काम न करणं हे जुनाट विचार आहेत. मला यात काही वावगं वाटत नाही, असं करिना कपूर म्हणते.
'शाहिद आणि मी एकाच चित्रपटात असलो, तरी एकत्र शूटिंग केलेलं नाही. मात्र मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल. शेवटी आम्ही कलाकार आहोत आणि प्रोफेशनली वागणं आम्हाला पसंत आहे. काम करताना भावभावना मध्ये आणण्याची गरजच नाही' असं करिनाने स्पष्टपणे म्हटलं आहे.
मात्र एका वेब पोर्टलच्या माहितीनुसार करिनाने शाहिदसोबत सिनेमाचं प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. मोठ्या मिन्नतवाऱ्या करुन करिनाला सिनेमाच्या ट्रेलर लाँचला उपस्थित राहण्याची गळ घालण्यात आली.