मुंबई : बॉलिवूडमधील निर्माता दिग्दर्शक करण जोहर कायमच आपल्या घरी कलाकारांसाठी पार्टीचं आयोजन करत असतो. त्याच्या अशाच एका पार्टीमधील व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर दिल्लीतील शिरोमणी अकाली दलाच्या आमदारासह अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हे कलाकार पार्टीमध्ये ड्रग्ज घेत होते, असं अनेकांनी म्हटलं आहे. या पार्टीत दीपिका पादूकोण, रणबीर कपूर, विकी कौशल, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, वरुण धवन, त्याची गर्लफ्रेण्ड नताशा दलाल, आयान मुखर्जी, शाहिद कपूर, त्याची पत्नी मीरा राजपूत सहभागी होते.


करण जोहरने शनिवारी (27 जुलै) कलाकारांसाठी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमधील व्हिडीओ करणने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमधील कलाकारांचे हावभाव पाहता सोशल मीडियावर अनेकांनी दावा केला आहे की, ते ड्रग्जच्या अंमलाखाली होते. यात सर्वाधिक टीकेचा सामना विकी कौशलला करावा लागला. कारण तो जिथे बसला होता, त्याच्या शेजारीच पांढऱ्या रंगाची पावडर दिसत आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये विकी आपल्या नाकावर हात ठेवताना दिसत आहे, त्यामुळे अनेकांना वाटलं की त्याने अंमली पदार्थाचं सेवन केलं आहे.


मात्र व्हिडीओ स्लो मोशनमध्ये पाहिल्यास स्पष्ट दिसतं की विकी कौशलच्या शेजारी कोणतीही पांढरी पावडर नसून प्रकाश परावर्तित झाला होता. कारण हा प्रकाश वेगाने गायबही होताना व्हिडीओत दिसतो. त्यामुळे स्पष्ट आहे की तिथे कोणताही पदार्थ ठेवलेला नव्हता.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक युझर्स आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंद सिंह सिरसा यांनीही या कलाकारांवर निशाणा साधला. "उडता बॉलिवुड - कल्पना विरुद्ध वास्तव. इथे पाहा बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार कशाप्रकारे नशेत दिसत आहेत. जर तुम्हीही माझ्याशी सहमत असाल तर ड्रग्ज घेणाऱ्या कलाकारांविरोधात आवाज उठवा." सिरसा यांनी या ट्वीटमध्ये शाहिद कपूर, दीपिका पादूकोण, अर्जुन कपूर, वरुण धवन, करण जोहर आणि विक्की कौशललाही मेंशन केलं आहे.


यानंतर मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी सिरसा यांचे आरोप निराधार असल्याचं सांगितलं. मिलिंद देवरा यांनी सिरसा यांना उत्तर दिलं की, "माझी पत्नीही या पार्टीत उपस्थित होते. तिथे कोणीही अंमली पदार्थांचं सेवन केलं नव्हतं. त्यामुळे खोट्या गोष्टी पसरवणं आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा लोकांना बदनाम करणं बदं करा. मला आशा आहे की, तुम्ही हिंमत करुन समोर याल आणि सगळ्यांची माफी मागाल."


दरम्यान, या मुद्द्यावर पार्टीत सहभागी असलेल्या कोणत्याही कलाकाराने अद्याप भाष्य केलेलं नाही.